मेट्रोंची कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक तयार करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 मेट्रोंची कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक तयार करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई, दि.४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एमएमआरडीए क्षेत्रातील सर्व मेट्रोंचे कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा; या कामांना विलंब चालणार नाही, पुढच्या वर्षीपासून दरवर्षी किमान 50 किमी मेट्रो कार्यान्वित होतील, असे नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होते.

यावेळी फडणवीस म्हणाले, अनेक ठिकाणी कारशेड शिवाय मेट्रो सुरू होत आहेत, त्यामुळे मेट्रो सुरू करण्यासाठी त्यासाठी थांबू नका. जगात असे प्रयोग होत आहेत, त्याचा अभ्यास करा. त्याला तात्पुरत्या पर्यायी व्यवस्था काय आहेत, याचा आढावा घ्या. भविष्यातील सर्व संभाव्य मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेत, त्यासाठी कारशेडसाठी जागा आतापासूनच आरक्षित करा. पुढच्या वर्षीपासून 50 किमी मेट्रो दरवर्षी सुरू होईल, याबाबत नियोजन करा. यावर्षी किमान 23 किमी मेट्रो सुरू होईल. तसेच मेट्रो-3 मुळे २० ते २५ किलोमीटरची त्यात आणखी भर पडेल.

इंदू मिल येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक डिसेंबर २०२५ अखेरीस पूर्ण करा. तसेच हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून या दोन्ही प्रकल्पांच्या वार्षिक देखभालीसाठी आराखडा आताच तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, नगरविकास विभाग (1) चे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी,मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार , अश्विन मुदगल, महामुंबई मेट्रो संचलन महामंडळ व्यवस्थापकीय संचालक रुबल आगरवाल, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचे सादरीकरण केले.

ML/ML/SL

4 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *