पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीत 4 हजार 500 कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन

 पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीत 4 हजार 500 कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन

नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ 23 फेब्रुवारी रोजी संपत आहे. निवडणूक आयोग जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. गेल्या विधानसभा निवडणुका 2020मध्ये झाल्या होत्या. या निवडणुकीत आम आदमी पक्षाने 70 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या. यामुळेच यावेळी भाजपने निवडणूकांसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील सत्ताधारी आपने विविध योजनांच्या घोषणा सुरू केल्या आहेत. याला जोरदार आव्हान देत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत 45 शे कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करून भाजपाच्या प्रचाराची जोरदार सुरुवात केली. यामध्ये गरिबांसाठी घरे, शाळा-कॉलेज, प्रकल्प यांचा समावेश आहे. वीर सावरकर महाविद्यालयाची पायाभरणीही त्यांनी केली. यावेळी भाषण करताना त्यांनी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना टोला लगावत म्हटले की, मी स्वतःसाठी शिशमहल बनवला नाही, पण देशातील लोकांची घरे बांधली. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि आप यांच्यात मुख्य लढत होणार आहे. आपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचा चेहरा घेऊनच ही निवडणूक लढवण्याचे संकेत भाजपाने दिले आहेत. आज सकाळी दिल्ली भाजपाने ‘दिल्ली चली मोदी के साथ’ असे ट्विट केले होते. त्यानंतर मोदींनी दिल्लीतील विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.

दिल्लीच्या अशोक विहारमध्ये पंतप्रधान मोदींनी स्वाभिमान घर प्रकल्पांतर्गत 1,675 फ्लॅटच्या चाव्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्‍या लाभार्थ्यांना सुपूर्द केल्या. या प्रकल्पांतर्गत घरासाठी लाभार्थ्यांना केवळ 1.42 लाख रुपये आणि पाच वर्षांच्या देखभालीसाठी अतिरिक्त 30,000 रुपये द्यावे लागणार आहेत. याशिवाय दिल्ली विद्यापीठातील 600 कोटी रुपयांच्या 3 नवीन प्रकल्पांची पायाभरणी मोदींनी केली. यामध्ये नजफगढच्या रोशनपुरा येथील वीर सावरकर महाविद्यालयाच्या इमारतीचा समावेश आहे. मोदींनी द्वारका येथे सीबीएसई इमारतीचे उद्घाटनही केले. या इमारतीसाठी सुमारे 300 कोटी रुपये खर्च झाले आहेत. यामध्ये कार्यालये, सभागृह, डेटा सेंटर, जल व्यवस्थापन यंत्रणा यांचा समावेश आहे.

नौरोजीनगर येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि सरोजिनी नगर येथील जनरल पूल रेसिडेन्शिअल अ‍ॅकोमोडेशन या दोन शहरी पुनर्विकास प्रकल्पांचेही उद्घाटनही मोदींच्या हस्ते झाले. यात 28 टॉवर्सचा समावेश असून, त्यात 2,500 पेक्षा जास्त निवासी युनिट आहेत.लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या देण्याच्या कार्यक्रमात मोदी म्हणाले की, मला वाटले असते तर मीही स्वतःसाठी शिशमहल बनवू शकलो असतो. पण माझ्यासाठी देशातील लोकांची घरे महत्त्वाची आहेत. आज नाही तर उद्या देशातील लोकांना पक्की घरे मिळावीत, हे माझे स्वप्न आहे. मोदींनी कधीही स्वतःसाठी घर बनवले नाही. मात्र, गेल्या 10 वर्षांत देशातील 4 कोटींहून अधिक लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. मी तुमच्या सर्वांच्या आनंदात तुमच्या उत्सवाचा एक भाग होण्यासाठी आलो आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला पक्के छत आणि चांगले घर मिळावे, या संकल्पनेने आम्ही काम करत आहोत. हा संकल्प पूर्ण करण्यात दिल्लीचा मोठा वाटा आहे.

केंद्रातील भाजपाच्या सरकारने झोपडपट्ट्यांच्या जागी पक्की घरे बांधली. ज्यांना कोणतीही आशा नव्हती त्यांना आज पहिल्यांदाच दीड हजार घरांच्या चाव्या देण्यात आल्या आहेत. गरिबांच्या घरात चांगल्या जीवनासाठी आवश्यक असलेली प्रत्येक सुविधा असायला हवी. यातूनच गरिबांचा स्वाभिमान जागृत होतो. त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आम्ही इथेच थांबणार नाही. दिल्लीत अशी आणखी तीन हजार घरे बांधली जाणार आहेत. घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार गृहकर्जाच्या व्याजात मोठी सवलत देत आहे. मी त्या सहकार्‍यांचे, त्या माता-भगिनींचे अभिनंदन करतो, ज्यांचे एक प्रकारे नवीन आयुष्य सुरू होत आहे. भाड्याच्या घराऐवजी कायमस्वरूपी घर मिळणे, ही नवीन सुरुवात आहे.

SL/ML/SL

4 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *