सुईशिवाय घेता येणार वेदनारहीत इंजेक्शन – IIT मुंबईचे संशोधन

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंजेक्शन घेताना आजही लहान- मोठ्या बहुतेक व्यक्तींना भिती वाटते. आता अगदी बारीक सुई असलेली खूपच कमी वेदना होणारी इंजेक्शन आली असली तरीही अनेकांच्या मनात लहानपणी मोठ्या सिरिंजमधून घेतलेल्या इंजेक्शनच्या वेदना कायम आहेत. त्यामुळे आजही इंजेक्शन घ्यायचे म्हटल्यावर काहीशी भिती वाटतेच. मात्र आता मुंबई IITच्या संशोधकांनी यावर उपाय शोधला आहे.संशोधकांनी शॉकवेव्ह नावाची एक सिरींज विकसित केली असून ती वेदनारहित आहे. आयआयटी मुंबईच्या एरोस्पेस अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक वीरेन मेनेजेस यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकाने ‘शॉक सिरींज’चा वापर करून सुई न टोचता शरीरात औषधे पोहोचविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.त्यांचा अभ्यास अहवाल ‘जर्नल ऑफ बायोमेडिकल मटेरिअल्स अँड डिव्हाइसेस’मध्ये प्रकाशित झाला आहे.
या अभ्यासात त्यांनी शॉक सिरिंजद्वारे दिलेले औषध आणि प्रयोगशाळेतील उंदरांवर इंजेक्शनच्या सुईने इंजेक्शन दिलेल्या औषधाची तुलना केली.नियमित सुई असलेली सिरींज त्वचेला छिद्र करते तर शॉक सिरिंजमध्ये ही समस्या नसते.त्याऐवजी ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने प्रवास करणाऱ्या उच्च-ऊर्जा शॉक वेव्हचा वापर त्वचेला छिद्र पाडण्यासाठी केला जातो.जेव्हा या लहरी निर्माण होतात तेव्हा त्या आजूबाजूचे माध्यम जसे की हवा किंवा पाण्याला प्रेशर करतात.प्रेशराइज्ड नायट्रोजन वायू औषधाने भरलेल्या शॉक सिरिंजवर दाब लागू करून द्रव औषधाचा बारीक स्प्रे तयार करतो.या स्प्रेचा वेग विमानाच्या टेक-ऑफच्या वेगापेक्षा दुप्पट असतो.द्रव औषधाची ही फवारणी सिरिंजच्या तोंडातून बाहेर पडते आणि त्वचेत जाते.ही संपूर्ण प्रक्रिया रुग्णाला काही कळण्यापूर्वी अतिशय वेगाने घडते.
प्रियंका हंकारे यांनी या सिरिंज इंजेक्शनचे डिझाईन तयार केले आहे. त्या म्हणतात, ही सिरिंज औषध वेगाने योग्य ठिकाणी पोहोचवते. सामान्य सिरिंजच्या तुलनेत त्वचा आणि टिशूंना जास्त नुकसान करत नाही. सिरिंजचे नोझल 125 मायक्रोनपेक्षाही कमी ठेवले गेले आहे. त्यामुळे अजिबात वेदना जाणवणार नाही.
SL/ML/SL
28 Dec. 2024