राष्ट्रीय गणित दिन : नवोन्मेष आणि प्रगतीचा पूल साधणारे साधन
गणित म्हटलं की विषय आवडणारे आणि न आवडणारे दोन्ही विद्यार्थी एक गोष्ट सांगतील, की गणित अवघड विषय आहे. नवनवी आव्हाने देणारा हा विषय आहे. शंभर पैकी 95 विद्यार्थ्यांचा नावडता असला, तरीही शिकावाच लागतो, असा शाळेतला विषय म्हणजे गणित! आयुष्याचं गणित आणि व्यवहार दोन्ही सुरळीत हवं असेल, तर गणित शिकावं लागतंच, पण त्याही पलीकडे प्रत्येक काम करतांना, तार्किक बुध्दीचा वापर करतांना, गृहितके धरताना, त्याचा आधार गणित हाच असतो. म्हणूनच आपल्या आयुष्याचा तो अविभाज्य घटक आहे.
गणित विषयाला ज्यांनी वेगळी उंची मिळवून दिली, मोठं योगदान गणितात दिलं असे भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीदिनी, त्यांचे स्मरण म्हणून राष्ट्रीय गणित दिन साजरा केला जातो. 2012 साली, तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी एका कार्यक्रमात, डॉ. रामानुजन यांना श्रद्धांजली अर्पण करत, या दिवसाची घोषणा केली होती.
गणित या अवघड आणि रुक्ष वाटणाऱ्या विषयाला रोचक बनवण्यासाठी, गणित शिकण्याची प्रक्रिया मजेदार बनवण्यासाठी, यानिमित्त काही विशेष प्रयत्न केले जातात. कोडं सोडवायला आपल्याला मजा येते. लहानपणीच नाही, तर मोठं झाल्यावरही एखादं कोडं सुटलं नाही, तर अस्वस्थ वाटत राहतं. गणिताचंही तसंच आहे. ज्यांना ते समजत नाही, त्यांना ते आवडत नाही. पण एकदा प्रमेय सुटायला लागली, आकडेमोड जुळायला लागली, की गणित आवडू लागते. नव्हे, त्याचा छंदच लागतो. असं म्हणतात, की श्रीनिवास रामानुजन कोणत्याही गणिताचा असा फडशा पाडायचे, की ते गणिताला नाही, तर गणित त्यांना घाबरत असे!
भारतामध्ये तर गणिताची प्राचीन परंपरा आणि योगदान आहे. भारतीय गणितशास्त्राचे जनक, आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, महावीर, भास्कराचार्य ही प्राचीन काळातल्या भारतीय गणितीची नावं. भारतानं जगाला शून्याची देणगी दिली. ज्यामुळे गणिताची प्रमेय अधिक सुलभ झाली.
श्रीनिवास रामानुजन, भारताचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अद्भुत प्रतिभा असलेले गणितज्ज्ञ, तामिळनाडू मधल्या लहानशा गावात राहत होते. रामानुजन यांना लहानपणापासूनच गणिताची अवघड प्रमेये आणि थियरी तयार करण्याची आवड होती. त्यांनी गणिताचं औपचारिक शिक्षण घेतलं नव्हतं, त्यांच्या अचाट बुद्धीतून त्यांना सुचणारी प्रमेये ते त्यांच्या शिक्षकांना दाखवत, मात्र, त्यांचं विश्लेषण काळाच्या बरंच पुढचं होतं, त्यामुळे, त्यांच्या शिक्षकांना ते समजत नसे. तिथून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे, रामानुजन यांनी, केंब्रिज विद्याीठातील गणिताचे प्राध्यापक ग्रफोड हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. आपली गणिताची सूत्र, त्यांचं विश्लेषण आणि प्रमेय त्यांनी हार्डी यांना पाठवलं .
त्यांचं स्वयंभू संशोधन बघून हार्डी अत्यंत प्रभावित झाले आणि त्यांनी रामानुजन यांची केंब्रिजला येण्याची व्यवस्था केली. ट्रिनिटी विद्यापीठात त्यांनी आपलं शिक्षण अध्ययन सुरू केलं. आपल्या 32 वर्षांच्या अल्प अनुभवात रामानुजन यांनी 3900 गणिती सूत्रे तयार केली.
आजही मूलभूत गणित क्षेत्रात भारतात अनेक संस्थांमधे संशोधन होत आहे. त्याशिवाय, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लागावी म्हणून गणित शिकवण्याच्या अभिनव पद्धती वापरल्या जात आहेत.
आज शिक्षणाची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. नवनवे प्रयोग,कॉम्प्युटर पासून तर आजच्या एआय पर्यंतची साधने उपलब्ध आहेत, अशा वेळी मूलभूत गणिताच पाया मजबूत असेल, तर ह्या नव्या साधनांचा वापर आपण अधिक हुशारीने करू शकतो, त्याच दृष्टीने यंदाच्या गणित दिनाची संकल्पना ‘ नवोन्मेष आणि प्रगतीचा पूल साधणारे साधन’ अशी आहे. ज्यातून, गणिताचा आधुनिक काळात ही जास्तीत जास्त वापर आपण करू शकू.
सर्व गणित प्रेमींना राष्ट्रीय गणित दिनाच्या शुभेच्छा!