खातेवाटपाच्या चाव्या दिल्लीच्या हाती…
नागपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी अद्याप कोणत्याही मंत्राला खाते वाटप करण्यात आलेले नाही मंत्रिमंडळात विस्तारानंतर सहा दिवसांचे अख्खे हिवाळी अधिवेशन उलटून गेले तरीही अद्याप खातेवाटप झालेले नाही. यामुळे अनेक प्रकारच्या चर्चा असल्या तरी प्रत्यक्षात दिल्लीश्वरांच्या हाती या खाते वाटपाच्या चाव्या असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला तब्बल 39 मंत्र्यांनी मंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळाचा आकार आता 42 इतका झाला आहे. केवळ एक मंत्रीपद रिक्त असून एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यासह 39 इतकी मंत्र्यांची संख्या आहे. या विस्तारानंतर 16 ते 21 डिसेंबर असे सहा दिवसांचे हिवाळी अधिवेशन झाले. मात्र कोणत्याही मंत्राला अद्याप खात्यांचा वाटप झालेले नाही.
सुरुवातीला कोणते खाते कोणाकडे यावरून तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होती. मात्र नगर विकास हे खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे तर अर्थ खाते अजित पवार यांच्याकडे आणि गृह खाते भाजपाकडे राहील हे आता स्पष्ट झाले आहे. तरी देखील इतर खाती आणि खात्यांमधील अदलाबदल या संदर्भात नेमके स्वरूप काय असावे याबाबत दिल्लीतील भाजपाचे वरिष्ठ नेते अंतिम निर्णय घेणार आहेत. यामुळेच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी दिल्लीत दाखल होणार असून त्यानंतरच राज्यातील खातेवाटप जाहीर केले जाणार आहे.
ML/ML/PGB 21 Dec 2024