भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालयावर हल्ला; पोलिसांकडून लाठीचार्ज

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ रस्त्यावर उतरलेला भाजपाच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील राजीव गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयावर आज सायंकाळी 5 च्या सुमारास दगडफेक करून तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी कार्यकर्त्यावर लाठीचार्ज केला. या लाठीचार्ज मध्ये काही कार्यकर्ते जखमी झाला असून त्यांना आझाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सदर हल्ला नेमका कोणत्या कारणाने करण्यात आला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सायंकाळी 5 च्या सुमारास काँग्रेस कार्यालयावर चाल करून आले.
आणि त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा प्रकारची घोषणाबाजी करत कार्यालयावर दगडफेक केली. या तोडफोडीत कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमाव आक्रमक झाल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या लाठीचार्जमध्ये काही जण जखमी झाल्याचीही माहिती आहे.
संबंधित घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.
वर्षा गायकवाड यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच, या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींना शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
ML/ML/PGB 19 Dec 2024