जनतेने दिलेला कौल स्वीकारा, आपला खांदा वापरू देऊ नका…
नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल स्वीकारा त्यांचा अपमान करू नका. देशविरोधी कारवाया करणाऱ्या अर्बन नक्षल संघटनांना आपला खांदा विरोधकांनी वापरण्यासाठी देऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. विधानसभेत गेले दोन दिवस झालेल्या राज्यपालांच्या अभिभाषणा वरील आभार प्रदर्शन प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते.
विरोधकांनी निवडणूक आयोगावर दाखविलेला अविश्वास म्हणजे संविधानावर अविश्वास आहे, हा राजद्रोह च आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही ईव्हीएम ला दोष न देता फेक नरेटिव्ह ला थेट नरेटिव्ह ने उत्तर दिलं, आजवर ईव्हीएम विरोधात दाखल झालेल्या असंख्य याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत असं फडणवीस म्हणाले.
ज्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत त्या सुरूच राहतील, जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण केली जातील अशी ग्वाही त्यांनी दिली. शेतकरी, युवा, वंचित, बहिणी यांना दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील, लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता हे अधिवेशन संपताच दिला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले.
राज्य थेट परदेशी गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावरच, राज्यात मोठ्या संख्येने नवीन गुंतवणूक येत आहे, अनेक मोठे उद्योग येत आहेत, राज्यातील सर्व भागात ते येत आहेत. उद्योगधंद्यांना अभय देणं हे सरकारचं कर्तव्य आहे, त्यांना त्रास देण्याऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी खात्री त्यांनी दिली.
राज्यात चार नदी जोड प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत, यातून दुष्काळमुक्ती होईल. मुंबई मेट्रोचा दुसरा टप्पा येत्या मे महिन्यापर्यंत सुरू केला जाईल. आजवर राज्यात ६६९ मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत, २०२६ सालापर्यंत सोळा हजार मेगावॉट वीजनिर्मिती कार्यान्वित करून शेतीसाठी वीज उपलब्ध करून दिली जाईल अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली.
ML/ML/PGB 19 Dec 2024