मुंबई नजिक समुद्रात प्रवासी बोट बुडून तेरा प्रवाशांचा मृत्यू

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेट वे ऑफ इंडिया परिसरात एक दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. गेट वेहून एलिफंटा लेण्यांकडे जाणारी “निलकमल” नावाची बोट समुद्रात उलटली. या बोटीमध्ये एकूण 80 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती असून, सध्या प्राथमिक तपासात तेरा प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 21 प्रवाशांना सुखरूप वाचवण्यात बचाव पथकांना यश आले आहे. अजूनही पाच- सहा प्रवासी बेपत्ता आहेत
बोटींच्या धडकेमुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. नौदलाच्या एका स्पीड बोटने “निलकमल” बोटीस धडक दिल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या धडकेमुळे “निलकमल” बोट समुद्रात उलटली.
दुर्घटनेनंतर तत्काळ नौदलाच्या 11 बोटी, सागरी पोलिसांच्या 3 बोटी आणि तटरक्षक दलाच्या एका बोटीने घटनास्थळी मदतकार्य सुरू केले आहे. याशिवाय, 4 हेलिकॉप्टरच्या मदतीने समुद्रात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
“निलकमल” बोटीची अधिकृत क्षमता 84 प्रवाशांची होती, मात्र दुर्घटनेच्या वेळी बोटीत 80 प्रवासी असल्याचे समोर आले आहे. सुरक्षेचे नियम न पाळल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नेव्ही अथवा कोस्ट गार्ड यांची बोट प्रवासी बोटीला धडकल्याने हा अपघात झाला आहे, प्रवाशांची संख्या अजून निश्चित होत नाही. तेरा मृत्यू झाल्याचे समजते आहे, शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. मृत व्यक्ती नातेवाईकांना योग्य मदत दिली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं. महेश बालदी यांनी पुन्हा हा मुद्दा उपस्थित केला होता.
बचाव पथकाने आतापर्यंत 21 जणांना वाचवले आहे. मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव अद्याप समोर आलेले नाही. उर्वरित प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन आणि सागरी सुरक्षा दल सतर्क झाले आहेत. दुर्घटनेची चौकशी सुरू असून, बोटींच्या धडकेमागचे नेमके कारण लवकरच उघड होण्याची अपेक्षा आहे
ML/ML/PGB
18 Dec 2024