बीड आणि परभणी मधील हत्यांची चौकशी सीबीआय मार्फत करा
नागपूर, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीडमध्ये सरपंचाचा झालेला खून , परभणी मध्ये दलित तरुणाची झालेली हत्या, यासोबतच बीडमध्ये गेल्या वर्षभरात 32 जणांची झालेली हत्या यासाठी या सगळ्याची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तीची समिती नेमून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत विरोधी पक्षाने उद्यापासून नागपुरात सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार घातला आहे.
महाविकास आघाडीच्या सदस्य घटक पक्षांची आज बैठक होऊन त्यात चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे नेते बोलत होते. विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते .
महायुती सरकारमधील घटक पक्षांनी निवडणुकीच्या काळामध्ये जी आश्वासने शेतकऱ्यांना आणि लाडक्या बहिणींना दिली आहेत ती त्यांनी तातडीने पूर्ण करावी अशी मागणी देखील विरोधी पक्ष नेत्यांनी या पत्रकार परिषदेत केली.
परभणी मध्ये एका दलित कार्यकर्त्याचा कोठडीमध्ये झालेला मृत्यू हा पोलीस अत्याचारचे प्रतिक असून बीडमध्ये सरपंचाची झालेली निर्घृण हत्या ही गृह खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. यासोबतच बीडमध्ये झालेले 32 खून हा चिंता करायला लावणारा विषय असून या सगळ्या प्रकाराची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्ती मार्फत तसेच सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी नाना पटोले यांनी यावेळी केली.
विदर्भात होणारं हे अत्यंत कमी कालावधीचं अधिवेशन असून यामुळे विदर्भाला न्याय मिळणार नाही यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा अशी मागणी नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली .
विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पदाबाबत महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत याउलट अध्यक्षांनी परंपरा लक्षात घेता आघाडीच्या नेत्याला विधानसभेतले विरोधी पक्षनेते पद द्यावे अशी मागणी जितेंद्र आव्हाड आणि अंबादास दानवे यांनी या पत्रकार परिषदेत केली.
ML/ML/ SL
15 Dec. 2024