भारत सरकारने सीरियातून 75 नागरिकांना केले एअरलिफ्ट

दमास्कस, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सीरियात बंडखोरांनी सत्ता हाती घेतल्यानंतर भारताने तेथे अडकलेल्या 75 भारतीय नागरिकांना विमानातून बाहेर काढले. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी रात्री उशिरा ही माहिती दिली. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, सर्व भारतीय सुरक्षितपणे लेबनॉनला पोहोचले असून ते व्यावसायिक विमानाने भारतात परततील. बाहेर काढण्यात आलेल्या लोकांमध्ये जम्मू-काश्मीरमधील ४४ यात्रेकरूंचाही समावेश आहे. जे सीरियाच्या सईदा जैनबच्या दर्ग्यात गेले होते.
परराष्ट्र मंत्रालयाने पुढे सांगितले की, भारत सरकार परदेशात भारतीय नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते. सीरियातील भारतीय नागरिकांना दमास्कसमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचा सल्लाही मंत्रालयाने दिला आहे. “सीरियामध्ये उरलेल्या भारतीय नागरिकांनी आपत्कालीन हेल्पलाइन नंबर +963 993385973 (व्हॉट्सॲपवर) आणि ईमेल आयडी (hoc.damascus@mea.gov.in) वर दमास्कसमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा,” असे निवेदनात म्हटले आहे.
सीरियातील बंडखोरांनी पकडल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद रविवारी रशियाला पळून गेले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी असद आणि त्यांच्या कुटुंबीयांना राजकीय आश्रय दिला आहे. सीरियातील असद सरकार पडल्यानंतर इतर देशांकडून हल्ले तीव्र झाले आहेत. इस्रायलने सीरियाच्या दक्षिणेकडील भागावर हल्ला केला आहे, अमेरिकेने मध्यवर्ती भागावर हल्ला केला आहे आणि तुर्कीशी संबंधित बंडखोर सैन्याने उत्तर भागात हल्ला केला आहे.
सीरियातील हयात तहरीर अल शाम (एचटीएस) बंडखोर, ज्यांनी राष्ट्राध्यक्ष बशर असद यांची हकालपट्टी केली, त्यांनी सांगितले की ते महिलांवर कोणताही धार्मिक ड्रेस कोड लादणार नाहीत. सीरियातील सर्व समुदायांच्या लोकांसाठी वैयक्तिक स्वातंत्र्याची हमी देण्याची शपथही त्यांनी घेतली.
वृत्तसंस्था एपीने दिलेल्या माहितीनुसार, विद्रोही गटाच्या जनरल कमांडने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये महिलांच्या पेहरावात कोणताही हस्तक्षेप केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
अबू मोहम्मद अल जुलानीच्या नेतृत्वाखाली एचटीएस बंडखोर राजधानी दमास्कस ताब्यात घेतल्यानंतर संघटनेची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. एकेकाळी अल कायदाचा सदस्य असलेला जुलानी आता जगभर स्वत:ला सुधारणावादी म्हणून सादर करत आहे.