कुर्ला बेस्ट बस अपघात 7 जणांचा मृत्यू ; 49 जण जखमी
मुंबई दि.10(एम एमसी न्यूज नेटवर्क) : सोमवारी रात्री 9 च्या सुमारास कुर्ला पश्चिम येथून अंधेरीला जाणाऱ्या बेस्ट बसच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटुन अनेक वाहनांवर आदळल्याने ७ जणांचा मृत्यू झाला तर ४९ जण जखमी झाले आहेत.
या अपघातात आतापर्यत कन्निस अन्सारी (वय 55),आफरीन शाह (वय 19),अनाम शेख ( वय 20),शिवम कश्यप (वय 18),विजय गायकवाड (वय 70)व फारुख चौधरी (वय 54) यांचा मृत्यू झाला आहे.तर 49 जण जखमी झाले आहे.
बेस्ट बस कुर्ला येथील गजबजलेल्या परिसरातून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट गर्दीत शिरली. बेस्ट बसने अनेक वाहने आणि पादचाऱ्यांना धडक दिली. या अपघातामध्ये ४९ जण जखमी झाले. यापैकी सात जणांचा मृत्यू झाला. कुर्ला येथील भाभा रुग्णालयामध्ये चार, शीव रुग्णालय, कोहिनूर रुग्णालय, हबीब रुग्णालयात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. या अपघातामुळे कुर्ला आणि आसपासच्या परिसरात शोकाकळा पसरली आहे.
काल रात्री पर्यत भाभा रुग्णालयात ३८ जणांना उपचारासाठी आणण्यातआले होते. यापैकी ५ जणांना हबीब रुग्णालयात, ४ जणांना शीव रुग्णालयात, तसेच क्रिटीकेअर आणि सीटी रुग्णालयात प्रत्येकी १ रुग्णाला हलविण्यात आले. १६ जणांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले. त्यामुळे सध्या भाभा रुग्णालयामध्ये सात जणांवर उपचार सुरू असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयात दाखल बहुतांश रुग्णांना गंभीर दुखापत झाली असून, या सर्व रुग्णांचे सीटी स्कॅन करण्यात आले आहे. सीटी स्कॅनचा अहवाल सामान्य आला असल्याची माहिती भाभा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. पद्मश्री अहिरे यांनी दिली.
SW/ML/SL
10 Dec. 2024