एकनाथ शिंदे, अजित पवारांची टोलेबाजी, रोहित पाटील यांचे ‘ देवा ‘
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विधानसभेच्या सभागृहात गेले अडीच वर्ष बोलके दिसणारे एकनाथ शिंदे काहीसे नाराज असल्याची चर्चा होती , मात्र आज अध्यक्ष यांच्या निवडीनंतर झालेल्या भाषणात शिंदे आणि नंतर अजित पवार यांनी सभागृहात जोरदार टोलेबाजी करत आपण पुन्हा फॉर्मत आल्याचे दाखवून दिले आहे.
एकनाथ शिंदे नाराज असून त्यांना आधी मुख्यमंत्रीपद आणि नंतर गृहमंत्री पद हुलकावणी देत असल्याने ते त्यांच्या नियमित फॉर्ममध्ये दिसत नव्हते. मात्र आज विधानसभेचे नवीन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्यानंतर त्यांच्या संयत भाषणाने अभिनंदन प्रस्तावावरील चर्चा सुरू झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राजकीय टोलेबाजी करत नाना पटोले यांच्यावर चांगलीच टिकेची झोप उठवली. ईव्हीएम मशीन बद्दल शंका घेणारे पटोले जेमतेम 208 मतांनी निवडून आले याची आठवण शिंदे यांनी करून देत नानांना चांगलेच घेरले. याशिवाय अनेक दाखले देत त्यांनी विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली .
दुसरीकडे अजित पवार यांनी देखील शरद पवार यांचा उल्लेख टाळत काहीजण ईव्हीएम बद्दल आणि मतदानाबद्दल आकडेवारी देत असल्याचे सांगत आपल्याकडे देखील आकडेवारी आहे मात्र आपण ती पुन्हा केव्हा तरी किंवा नागपूर मधल्या अधिवेशनात बोलू असे सांगितले. यामुळे थेट थोरल्या पवारांनाच त्यांनी आव्हान दिले आहे. अजित पवार यांनी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचा उल्लेख करत विरोधक हरल्यावरच ईव्हीएम बद्दल बोलतात अन्यथा जिंकल्यानंतर शब्द सुद्धा काढत नाहीत याचा दाखला दिला. संविधानाबद्दल उल्लेख करत विरोधकांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेणे टाळले होते त्यावर गप गुमान शपथ घेतील अन्यथा विधानसभेत बसताच येणार नाही असा टोला विरोधकांना हाणला .
दुसरीकडे दिवंगत आर आर आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील हे या विधानसभेतले सर्वात तरुण निवडून आलेले सदस्य आहेत. त्यांनी नवीन तरुण अध्यक्षांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना आपण देखील नवखे आणि तरुण आमदार आहोत तेव्हा आपल्याकडेही लक्ष ठेवा अशी विनंती नार्वेकर यांना केली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाहत संत तुकाराम यांच्या ‘ अमृताहुनी गोड नाव तुझे देवा ‘ या अभंगाचा उल्लेख करत या देवाने आपल्याकडे देखील योग्य लक्ष ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर फडणवीस यांनी कोटी करत आपण ‘ अमृताहुनी गोड ‘ आहोत हे लक्षात ठेवा असं सांगितल्यावर सभागृहात हास्यकल्लोळ माजला.
ML/ML/SL
9 Dec. 2024