महायुतीचा सत्ता स्थापनेचा दावा, उद्या शपथविधी

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर आज लगेचच महायुतीच्या वतीने सत्ता स्थापनेसाठीचा दावा राज्यपालांकडे सादर करण्यात आला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचे शिफारस पत्र देऊन त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करावे अशी विनंती केली.
महायुतीचे तिन्ही नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय निरीक्षक विजय रूपानी, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, भाजपचे नेते विनोद तावडे आदीनी राजभवन येथे राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना सत्ता स्थापनेसाठी ते पत्र दिले . याप्रसंगी महायुतीचे घटक पक्ष असणारे जनसुराज्य पार्टी, युवा स्वाभिमान पक्ष आणि अपक्ष आमदार यांचाही या शिष्टमंडळामध्ये समावेश होता.
यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी आमचा दावा राज्यपालांना सादर केला आहे, त्यावर राज्यपाल महोदयांनी उद्या सायंकाळी आझाद मैदानात साडेपाच वाजता शपथ देण्याचे पत्र आम्हाला दिले असून त्यानुसार उद्या आमच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल असे सांगितले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी देखील या मंत्रिमंडळात सहभागी व्हावे आणि ते निश्चित होतील असा विश्वास आम्हाला वाटतो असेही फडणवीस यावेळी म्हणाले. आज सायंकाळी शपथविधी घेणाऱ्या लोकांची नावे प्रसार माध्यमांना जाहीर करू असेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. अजित पवार यांनी देखील आपली भूमिका या पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात अद्याप अस्पष्टता असली तरी मी मात्र उद्या संध्याकाळी शपथ घेणार आहे असं त्यांनी स्पष्ट केले. यावर अजित पवार यांना सकाळी किंवा संध्याकाळी शपथ घेण्याचा अनुभव आहे असा टोला एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला.
ML/ML/SL
4 Dec. 2024