भाजपा विधिमंडळ पक्षाची चार तारखेला, निरीक्षकही नियुक्त
मुंबई, दि.२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेले अनेक दिवस रखडलेली भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक अखेर येत्या चार तारखेला होत असून त्यासाठी पक्षाने दोन केंद्रीय नेत्यांना निरीक्षक म्हणून पाठवण्याची घोषणा देखील आज केली आहे. केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे या नेता निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून येणार आहेत.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून बहुतांश सर्व पक्षांनी आपापल्या विधिमंडळ पक्षाची बैठक घेऊन आपापला विधिमंडळ पक्ष नेता निवडला आहे. मात्र तब्बल 132 जागा मिळूनही भाजपाने आपला नेता अद्याप निवडलेला नव्हता. हा नेता नेमका कोण असेल या संदर्भामध्ये उलट सुलट चर्चा सुरू होत्या. भाजपाची कार्यपद्धती पाहता आयत्या वेळेला एखादा नवीन चेहरा नेता म्हणून दिला जातो का अशी अटकळ देखील बांधण्यात येत होती. मात्र आत्तापर्यंत भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हेच विधिमंडळ पक्षाचे नेते असतील असे आता स्पष्ट झाले आहे .
भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांची पहिली बैठक येत्या चार तारखेला सकाळी 11 वाजता विधिमंडळातील मध्यवर्ती सभागृहात बोलावण्यात आली असून त्यात रीतसर विधिमंडळ पक्षाची बैठक पक्षाचा नेता निवडला जाईल. यासाठी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने वित्त मंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांना केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. ते उद्या म्हणजेच तीन तारखेला रात्री मुंबईत दाखल होऊन आमदारांशी अनौपचारिक चर्चा करतील आणि चार तारखेला सकाळी बैठकीत नव्या नेत्याची निवड जाहीर करण्यात येईल. या बैठकीसाठी भाजपाच्या आमदारांना पक्षाकडून बोलावणे करण्यास सुरुवात झाली असून उद्या सायंकाळपर्यंत मुंबईत दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान पाच तारखेला होणाऱ्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तयारी पाहण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज आझाद मैदानावर भेट देऊन पाहणी केली . त्यासोबतच भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबई भाजपाची बैठक घेऊन त्यात शपथविधी सोहळ्याच्या तयारीसाठीच्या पूर्व सूचना दिल्या दिल्या आहेत. आजच्या पाहणी दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी झाले होते शिवसेनेचा मात्र कोणीही नेता सहभागी झाला नव्हता.
ML/ML/SL
2 Dec. 2024