वायनाड पोटनिवडणूकीत प्रियांका गांधी मोठ्या मताधिक्क्याने विजयी
वायनाड, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी वाड्रा विजयी झाल्या आहेत. काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटच्या (यूडीएफ) उमेदवार प्रियांका गांधी चार लाखांहून अधिक मतांनी विजयी झाल्या आहे. वायनाड पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी आणि त्यांचे प्रतिस्पर्धी यांच्यातील मतांचा फरक लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून निवडणूक लढवलेले राहुल गांधी आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त होता.
विजयानंतर वायनाडच्या जनतेचे आभार मानताना प्रियांका म्हणाल्या, ‘वायनाडच्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवला त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. काळाच्या ओघात हा विजय तुमचा विजय आहे, याची तुम्हाला जाणीव होईल आणि तुम्ही तुमचा प्रतिनिधी म्हणून निवडलेली व्यक्ती तुमच्या आशा-स्वप्ने समजून घेईल आणि तुमच्यासाठी लढेल, याची मी खात्री करून देते. संसदेत तुमचा आवाज होण्यासाठी मी उत्सुक आहे.’
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, प्रियांका गांधी यांना ६ लाखांपेक्षा अधिक मत मिळवून चार लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला. या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत वायनाडमधून निवडणूक लढवणारे राहुल यांना ६ लाख ४७ हजार ४४५ मते मिळाली आणि त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीआय) अॅनी राजा यांच्यावर ३ लाख ६४ हजार ४२२ मतांनी विजय मिळवला. २०१९ मध्ये राहुल यांना ७ लाख ०६ हजार ३६७ मते मिळाली होती आणि त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर ४ लाख ३१ हजार ७७० मतांनी विजय मिळवला होता.
SL/ML/SL
23 Nov. 2024