विषारी वायू गळतीमुळे सांगली जिल्ह्यात तिघांचा मृत्यू

सांगली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात बोंबाळेवाडी, शाळागाव येथे म्यानमार कंपनीत विषारी वायू गळतीमुळे तिघा महिलांचा मृत्यू झाला आहे. सुचित्रा उथळे, नीलम मारुती रेठरेकर आणि किशोर सापकर अशी मृतांची नावे आहेत. घटनेत सदर कारखान्यातील कामगार आणि नागरिक असे सात जण गंभीर जखमी झाले.
प्राजक्ता मुळीक, वरद मुळीक, शुभम यादव,सायली पुजारी, माधुरी पुजारी, मंदार नलवडे, अमित कातिरे अशी जखमींची नावे आहेत. शेळगाव एमआयडीसी परिसरात काल सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. जखमीवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. म्यानमार ही कंपनी रासायनिक खते तयार करण्याचे काम करते.

विषारी वायू गळती थांबावी यासाठी आवश्यक ते उपाय केले जात आहेत. या वायू गळतीमुळे परिसरातील नागरिकांना प्रकृतीचा त्रास जाणवू लागला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच महसूल आणि पोलीस खात्यातील कर्मचारी सदर ठिकाणी पोहोचले. दरम्यान सदरची वायू गळती थांबवण्यात आली आहे. सर्व जखमीना कराड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ML/ML/SL
22 Nov. 2024