बापरे! 2050 पर्यंत भारतातील लहान मुलांची संख्या एवढी होणार, युनिसेफचा अहवाल काय सांगतो वाचा
भारतातील लहान मुलांची संख्या २०५० सालापर्यंत ३५ कोटींवर पोहोचण्याचा अंदाज युनिसेफच्या एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. त्यांचे भविष्य सुरक्षित करणे हे मोठे आव्हान असणार आहे. हवामान बदल, पर्यावरणामुळे निर्माण होणारी संकटे यांच्याइतकेच हे तगडे आव्हान असेल, असे युनिसेफच्या ताज्या अहवालामध्ये म्हटले आहे. आजच्या तुलनेत भारतात १०.६ कोटी मुलांची घट होणार असली तरी चीन, नायजेरिया आणि पाकिस्तानसह भारताचा जागतिक मुलांच्या लोकसंख्येचा वाटा १५ टक्के इतका असेल,असेही अहवालात म्हटले आहे. युनिसेफचा प्रमुख अहवाल ‘स्टेट ऑफ द वर्ल्ड्स चिल्ड्रन २०२४, द फ्यूचर ऑफ चिल्ड्रन इन अ चेंजिंग वर्ल्ड’ हा बुधवारी नवी दिल्लीत जाहीर करण्यात आला. यात लोकसंख्याशास्त्रीय बदल, हवामान बदलाची संकटे आणि सीमावर्ती तंत्रज्ञानावर प्रकाश टाकण्यात आला आहे. २०५०पर्यंत लहान मुलांना तीव्र हवामान आणि पर्यावरणीय संकटांचा सामना करावा लागेल आणि सन २००० च्या तुलनेत जवळजवळ आठ पट जास्त मुले अतिउष्णतेच्या लाटेला सामोरे जातील असेही निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.