रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी दिली अण्वस्त्र वापरास परवानगी

मॉस्को, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर टाकलेल्या अणूबॉम्बने केलेल्या विध्वंसानंतरही जगभरातील देशांनी अण्वस्त्र बनवणे थांबवलेले नाही. भारतासह जगातिक बहुसंख्य विकसनशील आणि विकसित देशांनी स्वसंरक्षणार्थ अण्वस्त्रांची निर्मिती सुरुच ठेवली आहे. मात्र अद्याप त्याच्या वापरास कोणी धजावलेले नाही. मात्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी अण्वस्त्र वापराच्या निर्णयाला परवानगी देत जागतिक युद्धजन्य स्थितीला अधीक टोकदार केले आहे. दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी युक्रेनला रशियामध्ये लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी दिली होती, त्यानंतर पुतिन यांनी हा निर्णय घेतला.
एपी न्यूज एजन्सीनुसार, जर एखाद्या देशाने अणुशक्ती असलेल्या देशाच्या सहकार्याने रशियावर क्षेपणास्त्र हल्ला केला तर अशा परिस्थितीत मॉस्को अण्वस्त्रांचा वापर करू शकतो. युक्रेन युद्धाला 1000 दिवस पूर्ण झाल्यामुळे पुतिन यांनी अण्वस्त्रांशी संबंधित नवीन आदेशावर स्वाक्षरी केली आहे. अमेरिकेने युक्रेनला आर्मी टॅक्टिकल मिसाइल सिस्टम (ATACMS) वापरण्याची परवानगी दिली आहे. ही क्षेपणास्त्र प्रणाली 300 किमीपर्यंत अचूक हल्ले करू शकते.
काही काळापासून अमेरिका आणि ब्रिटन युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी देण्याचा विचार करत होते. यावर रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी अशा प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा वापर करण्यास परवानगी दिल्याचा अर्थ नाटो रशियाविरुद्धच्या युद्धात उतरला आहे, असा इशारा दिला होता. असे झाले तर नक्कीच उत्तर देऊ असे ते म्हणाले होते.
अमेरिकेने युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी दिल्यास बरेच काही बदलेल, असे पुतीन यांनी एका सरकारी टीव्ही चॅनलवर सांगितले होते. या शस्त्रांचा वापर उपग्रहाशिवाय शक्य नाही. युक्रेनमध्ये असे तंत्रज्ञान नाही. हे केवळ युरोपियन युनियन उपग्रह किंवा अमेरिकन उपग्रहाच्या मदतीने केले जाऊ शकते. या क्षेपणास्त्र प्रणालींचा वापर करण्याचे प्रशिक्षण केवळ नाटोच्या लष्करी जवानांनाच मिळाले आहे, असेही पुतीन म्हणाले होते. युक्रेनचे सैनिक ही क्षेपणास्त्रे चालवू शकत नाहीत.
SL/ML/SL
19 Nov. 2024