आयोगाने फेटाळली उमेदवाराची मतदानाच्या दिवशी चप्पल बंदीची मागणी
धाराशिव, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अगदी काही तासांवर येऊन ठेपली असताना उमेदवारांच्या विचित्र मागण्यांनी निवडणूक आयोगाला भंडावून सोडले आहे. परंडा विधानसभा मतदारसंघातील एका अपक्ष उमेदवाराला ‘चप्पल’ निशाणी मिळाली आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात चप्पल घालून येण्यावर बंदी घालण्याची अजब मागणी केली होती. पण आयोगाने ही मागणी फेटाळून लावली आहे.
गुरुदास कांबळे यांनी निवडणूक आयोगाकडे आपल्या चप्पल निशाणीबाबत निवडणूक आयोगाकडे केलेल्या मागणीवर आयोगाने त्यांना लेखी उत्तर पाठवले आहे. याबाबत सहायक निवडणूक अधिकारी जयवंतराव पाटील यांनी म्हटले आहे की, चप्ला या नियमित वापराचे साधन आहेत.त्यामुळे मतदान केंद्र परिसरात त्यांचा वापर थांबवता येऊ शकत नाही.त्यामुळे बंदीची मागणी फेटाळण्यात येत आहे. दरम्यान,अपक्ष उमेदवार गुरुदास कांबळे यांच्याआधी मुंबईतील धारावी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ईश्वर ताथवडे यांनी निवडणूक आयोगाकडे अशीच मागणी केली होती. त्यांना मात्र आयोगाने अद्याप उत्तर दिले नसल्याने ताथवडे यांनी आयोगाला आता पुन्हा स्मरणपत्र पाठवले आहे.
SL/ML/SL
17 Nov. 2024