१९ भारतीय कंपन्यांवर अमेरिकेकडून निर्बंध
न्यूयॉर्क, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रशियाला युक्रेनविरोधी युद्धात मदत केल्याचा आणि निर्बंधांमधून पळवाटा मिळवून दिल्याचा आरोप करत अमेरिकेने १९ भारतीय खासगी कंपन्या आणि दोन व्यक्तींवर निर्बंध लादले आहेत. अमेरिकेच्या वित्त आणि परराष्ट्र विभागाने १२ देशांतील ४०० कंपन्यांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा उगारला आहे. ही आतापर्यंत केलेली सर्वांत मोठी कारवाई मानली जाते आहे.
शनिवारी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला. “अमेरिकेने भारतीय कंपन्यांवर निर्बंध लादल्याचे वृत्त आहे. मात्र, भारताकडे व्यापार धोरण-व्यापार नियंत्रणासंदर्भात एक कायदेशीर प्रक्रिया आहे. आम्ही त्याचे पालन करतो. याशिवाय भारत वासेनार व्यवस्था, ऑस्ट्रेलिया समूह आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण व्यवस्थेचाही सदस्य आहे. तसेच आम्ही आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचेही पालन करतो”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
जैस्वाल पुढे म्हणाले “आमच्या माहितीनुसार ज्या कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. त्यापैकी कोणतीही कंपनी भारतात कायद्याचे उल्लंघन करत नाही. मात्र, तरीही अमेरिकेच्या आरोपानंतर आम्ही संबंधित विभागाच्या संपर्कात आहोत. तसेच आम्ही अमेरिकेतील अधिकाऱ्यांशीही यासंदर्भात चर्चा करतो आहे.”
SL/ML/SL
2 Nov. 2024