कर्करोग रुग्णालयासमोर अन्नदान स्वीकारण्यासाठी ‘जय श्रीराम’ म्हणण्याची अट घालणारा अटकेत
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अन्नदान हे श्रेष्ठ दान असे म्हटले जाते. मात्र अन्न वाटप करताना स्वीकारणाऱ्या व्यक्तीला कोणतीही अट घालणे हे खरोखरच घृणास्पद आहे. त्यातही ही घटना जर आजाराने पिडित रुग्णांच्या नातेवाईकांबाबत घडली असेल तर फारच गंभीर मानली पाहिजे. मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयात देशभरातून अल्प उत्पन्न गटातले कर्करोग ग्रस्त रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येतात. कित्येकदा राहण्याची सोय नसल्याने ते रुग्णालयासमोरच मुक्काम ठोकतात. यांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था उत्तम काम करत आहेत. मात्र यात काही धर्मांध व्यक्ती या कामाला गालबोट लावतात. अन्नदान करत असताना घेणाऱ्याला “जय श्रीराम ” म्हणायला लावणाऱ्या अशाच एका व्यक्तीला आता अटक झाली आहे.
काल परळच्या कर्करोग रुग्णालयासमोर एक व्यक्ती अन्नदान करत होता. त्याच्यासमोरील रांगेत एक मुस्लिम महिलाही उभी होती. तिला त्याने जेवण हवे असल्यास जय श्रीराम बोलावे लागेल असे सांगितले. त्याला नकार दिल्यावर या दोघांमध्ये वाद झाला. हिंदू नसलात तरी जय श्रीराम बोलण्यात काहीही हरकत नाही असे काहींनी म्हटले. काहीजणांनी मात्र या प्रकाराला तीव्र आक्षेप घेतला. या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णांसाठी अन्नदान केले जात असते. सामाजिक जाणीव व मानवतेच्या दृष्टीने हे अन्नदान केले जाते. मात्र अन्नदानाचाही प्रचारासाठी असा प्रयत्न कधीही झालेला नाही. अशा प्रकारच्या सक्तीमुळे या भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी या व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवून त्याला नोटीस बजावण्यात आली आहे. असे प्रकार करुन कायदा व सुव्यवस्थेचा भंग केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल अशी समज या नोटीशीतून देण्यात आली आहे.
SL/ML/SL
31 Oct. 2024