बोरीवलीत भाजपमध्ये सुटत नाही उमेदवारीचा तिढा, स्थानिक उमेदवारच देईल आमच्यासाठी लढा!
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बोरीवली पश्चिम विधानसभा ही भारतीय जनता पक्षाची सर्वात विश्वसनीय आणि खात्रीशीर जागा आहे. अनेक वर्षांपासून हा भाजपाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. भाजपाने कोणताही उमेदवार उभा केला तरी जनता डोळे मिटून त्याला मतदान करते, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. मात्र इथे अडचण अशी आहे की आजपर्यंत भाजपाला इथे स्थानिक उमेदवार देता आलेला नाही. बाहेरचे उमेदवार इथे येऊन निवडणूक लढवून जिंकत आहेत. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनात नाराजी आहे.
आता निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असतानाही, खात्रीशीर जागा असतानाही भाजपाने मात्र अजूनही इथे उमेदवार घोषित केलेला नाही. त्यामुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. सध्या भाजपामध्ये बोरीवली पश्चिम विधानसभेच्या जागेसाठी जणू दंगल सुरु आहे. जिल्हा अध्यक्ष गणेश खांडकर यांचे नाव समोर येत असून त्यांना पालिकेची निवडणूकही जिंकता आलेली नाही. शरद साटम हे देखील इच्छुक असून ते बोरीवलीचे रहिवासी नसून कांदिवलीचे रहिवासी आहेत आणि त्यांच्याकडे निवडणूक लढण्याचा अनुभवच नाही. स्नेहल शाह हे नाव देखील चर्चेत असून ते भाजपाचे प्राथमिक सदस्यही नाहीत. दुसरीकडे विद्यमान आमदार सुनील राणे यांना तिकीट मिळणार नाही की नाही याबाबत अजूनही शाश्वती नाही. त्याचबरोबर माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना लोकसभेत पक्षाने डावलले असल्यामुळे त्यांच्याकडूनही नाराजीचा सूर लागत आहे. त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी “आता माघार नाही!” म्हणत शक्तीप्रदर्शनही केले आहे.
थोडक्यात भाजपच्या उमेदवारांचा तिढा सुटता सुटत नाही. खात्रीशीर जागा असूनही भाजपला उमेदवार न घोषित करता आल्यामुळे पक्षाचं हसू होत आहे, अशी चर्चा स्थानिक लोक करताना दिसत आहेत. या सर्व राजकीय परिस्थितीत स्थानिकांना काय हवे आहे, याकडे हाय कमांड डोळेझाक करत आहे. मग हा तिढा सुटत नसेल तर वेगळा पर्याय समोर यायला हवा अशी कुजबुज बोरीवलीत सुरु झाली आहे. समान विचारधारा असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा विचार का होऊ नये अशी जनतेची धारणा आहे आणि जर शिवसेनेचा विचार होणार असेल तर जनतेच्या कार्याला वाहुन घेतलेल्या संध्या विपुल दोशी यांच्या नावाचा विचार का केला जाऊ नये, असा प्रश्नही जनतेच्या मनात निर्माण होत आहे.
संध्या दोशी यांच्याकडे १५ वर्षे नगरसेविका म्हणून कार्य केल्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. स्थानिक जनतेशी त्यांचा चांगला संपर्क व ऋणानुबंध आहे. विशेष म्हणजे त्या जन्माने कोकणस्थ मराठी आहेत आणि विवाहानंतर आपलं मराठीपण जपत गुजराती संस्कृतीलाही त्यांनी आपलसं केलं आहे. म्हणजेच मराठी आणि गुजराती समाजातही त्यांना मान आहे. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा गेली २० ते २५ वर्षांपासून राजकारणात चांगली प्रतिमा ठेवून विकासकामे करीत आहेत. त्यांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी विभागातील विविध समस्या सोडवल्या आहेत, इतकंच काय तर लोकांच्या सुख-दुःखातही त्या सहभागी झालेल्या आहेत. आजही त्यांच्या कामाचा सपाटा पाहण्यासारखा असतो. तसेच त्यांचे सर्व पक्षीय नेत्यांशी चांगले हितसंबंध आहेत.
म्हणूनच भाजपामधल्या उमेदवारांच्या दंगलीला लोक कंटाळले असून “उमेदवार स्थानिक, नियत प्रामाणिक” असा नारा लोक देत आहेत. बदल घडवण्याच्या दृष्टीने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला का संधी देण्यात येऊ नये? असा सवाल ते उठवत आहेत. आता हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल की भाजपाचे श्रेष्ठी स्थानिक जनतेच्या मताला मान देतील की उमेदवारांच्या कुरघोडीला बळी पडतील?
ML/ ML/ SL
26 October 2024