महायुतीचे २७७ जागांवरचे उमेदवार ठरले!
नागपूर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क): महायुतीमध्ये २७७ जागा एकमताने ठरल्या असून उर्वरित जागांवर दोन दिवसांत निर्णय होऊन जागावाटपाच्या चर्चा बंद होतील, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ते म्हणाले, भाजपाची दुसरी आणि तिसरी यादी केंद्रीय संसदीय बोर्ड जाहीर करणार आहे. भाजपाच्या इच्छुकांनी उमेदवारी जाहीर झाल्याशिवाय केंद्रीय पालिर्यामेंट्री बोर्डाच्या विरुद्ध जाऊन नामांकन अर्ज दाखल करू नये असे भाजपा कार्यकर्त्यांना बजावले आहे.
आर्णी विधानसभा मतदासंघातील माजी आमदार राजू तोडसाम, मूर्तीजापूर विधानसभा क्षेत्रातील नेते रवी राठी यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला. त्यांचे पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचे स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या. अमरावती जिल्हा उपाध्यक्ष तसेच मोर्शी विधानसभेचे भाजपा नेते उमेश यावलकर यांनी दिलेला राजीनामा परत घेतल्याची माहिती बावनकुळे यांनी यावेळी दिली. पक्षप्रवेशाने भाजपा संघटन मजबूत होणार असून येत्या काळात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होतील असा विश्वास व्यक्त केला.
*• मोदींच्या १३ ठिकाणी सभा*
महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात ११ते १३ ठिकाणी सभा होणार असून मुंबई,गोंदिया, अकोला, नांदेड, धुळे, नवी मुंबई यासह अन्य शहरे ठरत आहेत.बावनकुळे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नागपुरात कोणतीही जागा मागितली नाही. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपाच्या संपर्कात आहेत. जिल्हाचे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार हे त्यांच्याशी समन्वय साधून योग्य निर्णय होईल. नागपूर शहरात प्रत्येक जागेसाठी 5 ते 8 नावे पार्टीकडे आली आहेत. निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड करेल.नवाब मलिक यांच्याबाबत निर्णय अजित पवार घेतील. त्यांना सांगण्यात आले आहे. आमची चर्चा झाली. आमदार रवी राणा हे त्यांच्याच युवा स्वाभिमान पक्षात राहतील.
ML/ ML/ SL
25 Oct 2024