घड्याळ चिन्हाची सुनावणी आता ६ नोव्हेंबरला
नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणूका तोंडावर आल्या तरीही राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही गटात घड्याळ चिन्हावरून सुरु असलेला तिढा अद्याप सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने घडयाळ हे चिन्ह गोठवण्याच्या मागणीसाठी केलेल्या याचिकेवरील सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा पुढे ढकलली. आता ४ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असून तोपर्यंत आपण याआधी दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करा,असे न्यायालयाने दोन्ही गटांना बजावून सांगितले.घडयाळ चिन्हाच्या खाली ‘या चिन्हासंबंधीचा वाद प्रलंबित आहे’,असा डिस्क्लेमर छापत असल्याचे शपथपत्र सादर करा,असे निर्देश न्यायालयाने अजित पवार गटाला दिले.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय खंडपीठासमोर आज यासंबंधी शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दाखल केलेली ही दुसरी याचिका आहे.अजित पवार गटाला विधानसभेच्या निवडणुकीत घड्याळ चिन्ह वापरण्यास मनाई करावी, घडयाळ चिन्ह गोठवावे आणि अजित पवार गटाला दुसरे चिन्ह द्यावे,अशी मागणी शरद पवार गटाने याचिकेद्वारे केली आहे.
SL/ML/SL
24 Oct. 2024