जागावाटपावरून मविआतील मतभेद अधिक तीव्र
नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अगदी काही दिवसांवर आलेली असताना महाविकास आघाडीतील जागा वाटपाचे वाद विकोपाला गेल्याचे दिसत आहे. आज उध्दव ठाकरे यांनी ताठर भूमिका घेतल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी थेट दिल्ली गाठली आहे तर शरद पवार यांनी काँग्रेस श्रेष्ठींशी फोनवरून संपर्क साधल्याचे समजते.
दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला होता. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या दोन नेत्यांमध्ये विदर्भातील जागांवरून मतभेद झाले. नाना पटोले असतील तर जागा वाटपाच्या चर्चेत आम्ही उपस्थित राहणार नाही, अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाने घेतली. त्यानंतर हा वाद मिटवण्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी काल मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटी नंतर नाना पटोले आणि संजय राऊत या नेत्यांनी गळ्यात गळे घालत आपल्यामध्ये जागा वाटपावरून कोणताही वाद नसल्याचे म्हटले होते. मात्र या घटनेला चौविस तास उलटत नाहीत तोच आज शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील जागा वाटपाच्या रस्सीखेचीला पुन्हा तोंड फुटले.
त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर ठाकरे गटाच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली होती. तर या वादावर तोडगा काढण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी शरद पवाराची भेट घेतली. आज नवी दिल्लीतही महाराष्ट्रातील जागा वाटपाचा प्रश्न सोडवण्यासाठी उच्चस्तरीय बैठक सुरु आहे. दरम्यान आघाडी तुटू नये म्हणून आपण प्रयत्नशील आहोत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांशी संवाद साधणार आहोत, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतल्याची माहिती समोर येत आहे.
भाजपाने पक्की मोर्चेबांधणी करत आज विधानसभेच्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या पार्श्वभूमीवर आघाडीची उद्या मुंबईत होणारी पत्रकार परिषद ही रद्द करण्यात आली आहे. आघाडीच्या जागावाटपांच्या घोळावर नक्की काय तोडगा निघतो, आघाडी संघटीत राहते की विखुरते हे पाहणे रंजक ठरणार आहे.
SL/ML/SL
20 Oct. 2024