ऑलिम्पिक विजेत्यांना राज्य सरकारकडून बक्षिसाची रक्कम प्रदान
मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोठ्या प्रतिक्षेनंतर आज महाराष्ट्र सरकारने राज्यातील ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना बक्षिसाची रक्कम प्रदान केली आहे. पॅरिस, फ्रान्स येथे २०२४ मध्ये झालेल्या ऑलिंम्पिक स्पर्धेमध्ये पदक प्राप्त खेळाडूंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते धनादेश आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आज खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, क्रीडा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त सुरज मांढरे उपस्थित होते.
पॅरिस, फ्रान्स येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील नेमबाजी स्पर्धेमधील ५० मीटर रायफल ३ पोझीशन या उपप्रकारामध्ये कास्य पदक प्राप्त करणाऱ्या स्वप्निल कुसळे व पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतील मैदानी स्पर्धेमधील गोळाफेक या उपप्रकारामध्ये रौप्य पदक प्राप्त करणाऱ्या सचिन खिलारी या खेळाडूंचा व श्री.कुसळे यांच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे व श्री. खिलारी यांचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले.
19 Oct. 2024