शरद पवार दुबईमध्ये दाऊदला भेटल्यांचा ॲड. प्रकाश आंबेडकर गौप्यस्फोट

 शरद पवार दुबईमध्ये दाऊदला भेटल्यांचा ॲड. प्रकाश आंबेडकर गौप्यस्फोट

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :शरद पवार १९८८-९१ या काळात मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या एका दौऱ्यामध्ये त्यांनी दाऊद इब्राहिमची भेट घेतल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत केला.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, १९८८-९१ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते. त्यातील त्यांचा एक दौरा होता लंडनला. तिथून ते कॅलिफोर्नियाला गेले. तिथे ते दोन दिवस राहिले. त्यांची मीटिंग कोणासोबत झाली. त्याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे. कॅलिफोर्नियामधून शरद पवार लंडनला पुन्हा आले. दोन दिवस लंडनमध्ये थांबले. तिथून दुबईला गेले आणि दुबईमध्ये त्यांची दाऊद इब्राहीमसोबत विमानतळावर भेट झाली. त्यांना तिथे सोन्याचा हार घालण्यात आला.

१९८८-९१ या काळात शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांना केंद्र सरकारची परवानगी असल्याशिवाय दौऱ्यावर जाता येत नाही. तेव्हा केंद्र सरकारने त्यांना कॅलिफोर्नियाच्या बैठकीत उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती का ? शरद पवार यांना केंद्र सरकारने त्या वेळी परवानगी दिली असेल, तर मग दुबईत जाऊन दाऊद इब्राहिमला भेटण्याची परवानगी पण दिली होती का? आणि त्या बैठकांचा अहवाल केंद्र सरकारला दिला होता का? असे सवाल ॲड. आंबेडकर यांनी उपस्थित केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५४ मध्ये सूचित केले होते की, चीन हे विस्तारवादी आहे. जर आपण आपली सुरक्षा करण्याच्या स्थितीत आलो नाही, तर चीन आपल्यावर हल्ला करू शकतो. बाबासाहेबांचे हे मत केंद्र सरकारने ऐकले नाही. त्याचा परिणाम आज आपल्या सर्वांना दिसत असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले. एकीकडे यूएस, कॅनडा आणि भारत यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरू आहे. तर दुसरीकडे इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष येणाऱ्या काळात वाढणार अशी शंकाही आंबेडकर यांनी व्यक्त केली. पॅलेस्टाईन आणि इस्राईलची भांडणे चालू आहेत. आपले केंद्र सरकार आतून इस्राईलसोबत आहे आणि बाहेरून पॅलेस्टाईनसोबत आहे, अशी परिस्थिती असल्याचे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

भारताची आजची परिस्थिती आहे, ती १९९०-२००० सालासारखी दिसत आहे. मध्यंतरी बॉम्ब ब्लास्ट होत होता, कोणाला तरी गोळी मारली जायची ते काही दिवसांपासून पुन्हा सुरू झाल्याचे दिसत आहे, असेही त्यांनी या वेळी म्हटले. बाबा सिद्दीकी यांची हत्या सुद्धा त्यामुळेच झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

PGB/ML/PGB
18 Oct 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *