लवकरच सुरु होतेय हॉंगकॉंग सिक्सेस ही अनोखी क्रिकेट स्पर्धा
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सात वर्षांनंतर हाँगकाँग क्रिकेट सिक्सेस ही अनोखी स्पर्धा पुन्हा सुरू होणार आहे. हाँगकाँग क्रिकेट सिक्स स्पर्धेचे नियम नियमित क्रिकेट सामन्यांपेक्षा खूपच वेगळे आहेत. या स्पर्धेत भारतीय संघ खेळणार आहे. नुकतीच याबाबत घोषणा झाली. या स्पर्धेत कोणते भारतीय खेळाडू खेळणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. १ ते ३ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, नेपाळ, न्यूझीलंड, ओमान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि यूएई हे १२ संघ सहभागी होणार आहेत.
स्पर्धेचे अनोखे नियम
- या स्पर्धेतील सामन्यात संघाला फलंदाजीसाठी फक्त ५ षटके मिळतात.
- दोन संघांमधील सामन्यात, प्रत्येक संघात ६ खेळाडू खेळतात. एका संघाला खेळण्यासाठी ५ षटके मिळतात आणि नेहमीच्या क्रिकेट सामन्याप्रमाणे एक षटक ६ चेंडूंचे असते. पण अंतिम सामन्यात एका षटकात ६ चेंडूंऐवजी ८ चेंडू टाकले जातात. म्हणजे साखळी सामन्यात प्रत्येक संघ ३० चेंडू खेळतो, परंतु अंतिम सामन्यात संघ ४० चेंडू खेळतो.
- विकेटकीपर वगळता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील प्रत्येक खेळाडू एक षटक टाकू शकतो. जर गोलंदाजाने वाइड किंवा नो-बॉल टाकला तर त्याला एक अतिरिक्त धाव नाही तर २ धावा मिळतात.
- ५ षटके पूर्ण होईपर्यंत संघाच्या ५ विकेट पडल्या तरी सहावा खेळाडू फलंदाजी सुरू ठेवू शकतो. म्हणजे एकटा फलंदाज फलंदाजी करू शकतो. अशा स्थितीत ५व्या क्रमांकावर बाद होणारा फलंदाज रनरची भूमिका बजावेल, पण एकही चेंडू खेळू शकणार नाही. जेव्हा संघाची ५ षटके पूर्ण होतात किंवा सर्व ६ फलंदाज बाद होतात तेव्हाच एक डाव संपतो.
SL/ML/SL
9 Oct. 2024