रायगड किल्ल्याची युनेस्को पथकाकडून पाहणी.

 रायगड किल्ल्याची युनेस्को पथकाकडून पाहणी.

महाड, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील रायगड किल्ल्याची युनेस्को च्या पथकाकडून काल पाहणी करण्यात आली. प्रतिष्ठित जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी नामांकनाच्या मुल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून युनेस्कोच्या शिष्टमंडळाने काल दिनांक ३ ऑक्टोबर रोजी रायगड जिल्ह्यातील रायगड किल्ल्याला भेट दिली आणि त्याची सखोल पाहणी केली.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय), महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग, वन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या अधिकाऱ्यांसह युनेस्कोच्या पथकाने किल्ल्याची सखोल पाहणी केली. या पथकाने कुशावर्त तलाव, होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर, बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज समाधी, हत्तीखाना, भवानी मंदिर आणि टोक, टकमक टोक, यांमहत्त्वपूर्ण ठिकाणासह विविध ऐतिहासिक खुणांना भेट दिली.

या पथकाने किल्ल्याचा इतिहास आणि सद्यस्थितीबद्दल उपस्थित अधिकाऱ्यांकडून तपशीलवार माहिती घेतली. या पथकामध्ये आंतरराष्ट्रीय तज्ञ हेवान्ग ली, सहसंचालक जागतिक वारसा (ए एस आय) मदन सिंग चौहान, महाराष्ट्र शासन पुरातत्व विभाग संचालक सुजित उगले,उपसंचालक हेमंत दळवी, डॉ शुभा मजुमदार यांचा समावेश होता.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या सोबत झालेल्या चर्चे दरम्यान त्यांनी किल्ल्यातील हवामान, वनस्पती आणि इतर संबंधित पर्यावरणीय घटकांवर चर्चा केली. तसेच या किल्ल्याच्या संवर्धनासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने घेतलेले निर्णय, सुरु असलेली कार्यवाही तसेच पर्यटन विकासासाठी केलेल्या उपाययोजना याबाबत माहिती घेतली. युनेस्कोने नामांकनाच्या संदर्भात हाती घेतलेल्या उपक्रमांबद्दल जावळे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच गडाच्या जतनामध्ये एकूणच प्रशासन, स्थानिक नागरिकांचा असलेला , सहभाग याविषयी माहिती दिली.

युनेस्को टीमने देखील देखभाल आणि संवर्धनासाठी संभाव्य सुधारणांबद्दल त्यांची मते मांडली. या भेटीदरम्यान, शिष्टमंडळाने स्थानिक प्रतिनिधी आणि गावकऱ्यांशी देखील संवाद साधला.

यावेळी रायगड किल्ला पाहण्यासाठी आलेल्या नवोदय विद्यालय निजामपूर च्या विद्यार्थ्यांशी देखील या पथकाने संवाद साधला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसाशी जोडलेल्या १२ निवडक किल्ल्यांपैकी स्वराज्याची राजधानी असलेला हा रायगड किल्ला जागतिक स्तरावर ओळखण्यासाठी विचाराधीन आहे. “या समावेशामुळे रायगड किल्ल्याला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळेल आणि जागतिक पर्यटक आकर्षित होतील, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
तसेच पर्यटनाला चालना
मिळेल.” असा विश्वास जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यावेळी व्यक्त केला.

ML/ML/PGB
4 Oct 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *