आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध नागरिक दिन: वृद्धांनाही प्रतिष्ठेचे जीवन जगण्याचा अधिकार

-राधिका अघोर
आज आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध नागरिक दिन आहे. जगभरात वयोवृद्ध नागरिकांकडे बघण्याचा दृष्टिकोन मायेचा, स्नेह आणि आदरचा असावा, त्यांच्या समस्या जाणून घेत, त्या कमी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, हा या दिनाचा उद्देश आहे.
वृद्धत्व या प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा एक अपरिहार्य टप्पा आहे. सगळं आयुष्य जगल्यावर, कर्तृत्व गाजवल्यावर, येणारी आयुष्याची संध्याकाळ, तुम्हाला निवांत करणारी, शरीर मनाला आराम देणारी असते. गात्रं थकली असतात, शरीर काम करु शकत नाही, कधी आजारपण मागे लागले असते. अशा काळात, आपला कुटुंबाला, समाजाला उपयोग नाही, अशी भावना वाढायला लागते. त्यात काही कारणाने अवलंबित्व आले असेल, तर अधिकच हतबलता येते.
आयुष्य स्वतःच्या मेहनतीवर, आपल्या मनाप्रमाणे घालवलेल्या वयोवृद्ध नागरिकांची अनेकदा म्हातारपणी केविलवाणी अवस्था होते. हेच लक्षात घेऊन, वयोवृद्धासाठी हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. यंदाच्या या दिनाची संकल्पना आहे, वृद्धत्व : प्रतिष्ठेचे जगणे: जगभरातील वयोवृद्धाची काळजी आणि आधार देणारी व्यवस्था अधिक बळकट करणे (Ageing with Dignity: The Importance of Strengthening Care and Support Systems for Older Persons Worldwide)
आज आपले औषधशास्त्र, आणि वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन अधिकाधिक प्रगत झाले आहे, त्यामुळे साहाजिकच पूर्वीच्या तुलनेत, वयोमर्यादेतही वाढ झाली आहे. त्यामुळे जगभरात वृद्धांची संख्या वाढली आहे. जपान, चीन सारख्या आशियाई देशात तर तिकडे युरोपातही अनेक देशात वृद्ध नागरिकांचे प्रमाण मोठे आहे. मात्र, विकसित देशात किमान आर्थिक संसाधने असल्याने, वृद्ध नागरिकांना जगायचे कसे? असे प्रश्न नाहीत, त्यांच्या वृद्धापकाळाची व्यवस्था त्यांनी केली असते.
भारतासारख्या विकसनशील आणि कुटुंबव्यवस्था असलेल्या देशात, आजकाल वृद्धांचा प्रश्न बिकट झाला आहे. आर्थिक चणचण असेल, निवृत्तीवेतनासारख्या सुविधा नसतील, तर म्हातारपणी अत्यंत हलाखीची परिस्थिती होऊ शकते. संपूर्ण कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नसेल, तर त्याचा पहिला आघात वृद्ध लोकांवर होतो,कारण त्यांचं कुटुंबातलं योगदान संपलं असतं. अत्यंत वाईट असली, तरी ही मानसिकता असते, आणि वृद्ध त्याचे बळी ठरतात. कधी आर्थिक परिस्थिती असली, तरीही, शरीर थकलं, वय झालं, आजारपण मागे लागलं, तर त्यांना बघणारे कोणी नसते. आजकाल, घरोघरी सगळ्यांनी नोकरी करणं सामान्य बाब झाली आहे, त्यामुळेही वृद्धांची काळजी घेणे कठीण जाते. कुठे त्यांचे करणे शक्य असूनही, त्यांना चांगली वागणूक दिली जात नाही. अडगळीत टाकल्यासारखे वागवले जाते. ह्या सगळ्या पलीकडे, आयुष्याची अखेर जवळ आल्याची जाणीव आणि येणारा एकटेपणा भावनिक, मानसिक दृष्ट्या अधिकच खचवणारा असतो.
जगरहाटी सुरू असते. आज तरुण असणारी, कर्तृत्व गाजवणारी व्यक्ती, कधीतरी म्हातारी होणार असते, थकणार असते, हे सगळ्यांनीच लक्षात घ्यायला हवे. आपण सुसंस्कृत आयुष्य जगतो, आणि त्याचा अर्थ असतो, प्रत्येक मानवाचा, प्रत्येक जीवाचा सन्मान करणे. भारतात तर माता पित्याला अत्यंत आदराचे, श्रद्धेचे स्थान म्हणून पहिले जाते. मातृ-पितृ देवो भव ! अशी आपली संस्कृती आहे. मात्र, भारतातही वयोवृद्धांकडे दुर्लक्ष, त्यांचे हाल होणे, त्यांची काळजी न घेतले जाणे, असे प्रकार अनेक घरात दिसतात, खरे तर, वृद्धाश्रम निर्माण होणे आणि ते चालणे, हे आपल्या कुटुंबव्यवस्थेचे अपयश आहे. समाजाची अपरिहार्यता म्हणून आपण ते स्वीकारले असले, तरी कुटुंबव्यवस्था कामकूवत झाल्याचेच ते लक्षण आहे.
शेक्सपिअर ने एका ठिकाणी म्हटले आहे- old men are babes again.. म्हणजे म्हातारपण हे पुन्हा येणारे शैशवच आहे. जीवनचक्राकडे बारकाईने पाहिले तर, आपल्या लक्षात येईल की खरोखर वृद्धावस्था बालपणासारखीच असते. वृद्ध लोकही लहान बाळासारखे वागतात, त्यांच्याच सारखे इतरांवर अवलंबून असतात. मात्र, मोठा फरक हा असतो, की आपल्या लहानग्या बाळात आपल्याला भविष्य दिसत असतं, उमेद असते, त्यामुळे त्यांचं करतांना आपण आनंदाने ते करतो, वृद्धांच्या म्हातारपणात निराशा शोधली जाते, त्यांचा कर्तृत्ववान भूतकाळ आणि त्यांनी आपल्याला वाढवलं आहे, हे ही मागे वळून बघायला आपण तयार नसतो. हा एकच दृष्टिकोन बदलला, आणि जीवनचक्राचं वास्तव स्वीकारले, तर आपल्या घरच्या ज्येष्ठ नागरिकांची सेवा आपण अधिक आनंदाने, अधिक प्रेमाने करु शकू. त्यांचे जे काही दिवस राहिले आहेत, ते आनंदाने जातील, समाधानाने जातील, याकडे लक्ष देऊ.
सध्या आपल्याकडे पितृपक्ष सुरू आहे. भारतीय हिंदू संस्कृतीत, पितरांचे ऋण फेडण्याचा हा काळ आहे. हा अत्यंत चांगला विचार आहे. मात्र, त्यालाच जोड देत, घरात, समाजात असलेल्या वयोवृद्धांची जिवंतपणीच सेवा करून, त्यांची संध्याकाळ अधिक सुखद केली तर त्याचे पुण्य अधिक लाभेल.