लवकरच होणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळावर पहिली लँडिंग टेस्ट
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बहुप्रतिक्षित आणि महत्त्वाकांक्षी नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आता अगदी अंतिम टप्प्यात आले आहे. आता या विमानतळावरुन लवकर विमानांचे उड्डान होणार आहे. येत्या 5 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाच्या धावपट्टीवर विमानाची पहिली लँडिंग टेस्ट होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सिडकोचे चेअरमन आमदार संजय शिरसाट यांनी दिली. सिडकोचे निर्देशक विजय सिंघल आणि संयुक्त प्रबंध निदेशक शांतनु गोयल या ठिकाणी सुरु असलेल्या कामांवर लक्ष ठेवत आहेत.
आमदार संजय शिरसाट यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी केली. त्यावेळी त्या ठिकाणी सुरु असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केला. त्यावेळी ते म्हणाले, 5 तारखेपर्यंत एअरफोर्सचे एक विमान रन वे वर ट्रायल करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करायचा आहे. या विमानतळावर 4 टर्मिनल आहे. त्या ठिकाणी जवळपास 350 विमाने एकाच वेळी पार्क करू शकतो.
नवी मुंबई विमानतळावर विविध कनेक्टिव्हिटी असणार आहे. मेट्रोसह बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी असणार आहे. एक्सप्रेस वे, उपनगरीय रेल्वे, जलमार्गाची कनेक्टिव्हिटी असणार आहे. त्याचा फायदा ठाणे, कल्याण, पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला होणार आहे.
असा असेल विमानतळ प्रकल्प
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ रायगड जिल्ह्यात उळवे आणि पनवेल दरम्यान 1,600 हेक्टर जमिनीवर तयार होत आहे.
- त्यासाठी सिडको नोडेल एजन्सी म्हणून काम करत आहे.
- 19 हजार 600 कोटी रुपये खर्च करुन हे विमानतळ उभारण्यात येत आहे.
- हा ग्रीनफील्ड एअरपोर्ट प्रॉजेक्ट 5 टप्प्यात पूर्ण होणार आहे.
SL/ML/SL
24 Sept 2024