७ तास, ७ मिनिट, ७ सेकंद शिवकालीन दांडपट्टा चालविण्याचा विक्रम
सोलापूर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ग्रामीण भागातील मुलांमध्ये छत्रपती शिवरायांच्या काळातील हत्यारे चालवण्याचे प्रशिक्षण घेण्याची आवड गेल्या काही वर्षांपासून निर्माण झाली आहे. सोलापूरच्या छत्रवीर कृष्णात पवार (रा. कर्देहळ्ळी, दक्षिण सोलापूर) या १० वर्षांच्या चिमुकल्याने सलग 7 तास 7 मिनिट 7 सेकंद शिवकालीन दांडपट्टा चालविण्याचा विक्रम केला. दोन्ही हातांनी त्याने सलगपणे दांडपट्टा चालविला. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून कर्देहळ्ळी येथे छत्रवीरने हा विक्रम केला. त्याच्या या शिवकालीन दांडपट्टा चालविण्याच्या विश्वविक्रमाची यूनिकॉर्न बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
ट्रॅडिशनल दांडपट्टा असोसिएशन (महाराष्ट्र) चे संस्थापक अश्विन कडलासकर हे छत्रवीर पवारचे प्रशिक्षक आहेत. आतापर्यंत छत्रवीरने विविध स्पर्धेत भाग घेऊन या खेळातील आपले प्रावीण्य सिद्ध केले आहे. आपले स्वतःचे जागतिक रेकॉर्ड स्थापित व्हावे यासाठी त्याने गेल्या 4 वर्षांपासून तासनतास सराव केल्याचे प्रशिक्षक अश्विन कडलासकर यांनी सांगितले.
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून 9 वाजून 5 मिनिटांनी त्याने दांडपट्ट्याचा खेळ सुरू केला. दुपारी 4 वाजून 12 मिनिटांनी त्याने हा खेळ बंद केला. त्याच्या या विक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आजची जी युवा पिढी मोबाईलमध्ये गुंतलेली असून युवकांनी मर्दानी खेळाकडे आकर्षित व्हावे, असे आवाहन ट्रॅडिशनल दांडपट्टा असोसिएशन (महाराष्ट्र) चे संस्थापक अश्विन कडलासकर यांनी केले आहे.
SL/ML/SL
24 Sept 2024