मुंबई किनारी रस्‍ता प्रकल्‍प वाहतुकीसाठी आठवड्यातील सातही दिवस राहणार सुरू

मुंबई दि.20(एम एमसी न्यूज नेटवर्क):धर्मवीर, स्‍वराज्‍यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्‍ता (दक्षिण) प्रकल्‍पातील वाहतूक व्‍यवस्‍था आठवड्यातील सातही दिवस सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेमार्फत धर्मवीर, स्‍वराज्‍यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्‍ता (दक्षिण) प्रकल्‍प हा शामलदास गांधी मार्ग (प्रिन्‍सेस स्‍ट्रीट) उड्डाणपूल ते वांद्रे – वरळी सागरी सेतूच्‍या वरळी टोकापर्यंत बांधण्‍यात येत आहे. आजतागायत या प्रकल्‍पाचे ९२ टक्‍के काम पूर्ण झाले आहे.

गणेशोत्‍सवादरम्‍यान मुंबई किनारी रस्‍ता प्रकल्‍प हा ६ सप्‍टेंबर ते १८ सप्‍टेंबर या कालावधीत २४ तास वाहतुकीसाठी खुला होता. आता, शनिवार २१ सप्‍टेंबर पासून मुंबई किनारी रस्‍ता प्रकल्‍प वाहतुकीसाठी आठवड्यातील सातही दिवस सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तर, रात्री १२ ते सकाळी ७ या वेळेत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

दक्षिणवाहिनी बिंदूमाधव ठाकरे चौक, रजनी पटेल चौक (लोटस जंक्‍शन) आणि अमरसन्‍स उद्यान ते मरीन ड्राईव्‍ह ही मार्गिका तसेच, उत्‍तरवाहिनी मरीन ड्राईव्‍ह, हाजी अली आणि रजनी पटेल चौक (लोटस जंक्‍शन) ते वांद्रे वरळी सागरी सेतूपर्यंतची (राजीव गांधी सागरी सेतू) मार्गिका वाहतुकीसाठी खुली राहणार आहे.
दरम्‍यान, धर्मवीर, स्‍वराज्‍यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्‍ता प्रकल्‍पाचे (दक्षिण) उर्वरित कामकाज वेगाने सुरू आहे. वाहनचालकांनी वेगमर्यादा, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. वाहतूक शिस्‍त पाळावी. वाहने चालविताना अधिकची काळजी घ्‍यावी. अपघात टाळावेत आणि महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे नम्र आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *