मुंबई आणि इंदूर दरम्यान नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्राची मंजुरी
नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय मंत्रिमंडळाने मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांमध्ये सर्वात कमी अंतराची रेल्वे संपर्क सुविधा प्रदान करण्यासाठी 309 किमी लांबीच्या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. मंजूरी मिळालेला प्रकल्प, सर्वात कमी अंतराच्या रेल्वे मार्गाने मुंबई आणि इंदूरला ही व्यावसायिक केंद्रे जोडण्याव्यतिरिक्त, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील अशा जिल्ह्यांना जोडेल जे आजवर रेल्वे मार्गाने जोडले नव्हते, यामध्ये महाराष्ट्रातील 2 आणि मध्य प्रदेशातील 4 जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रकल्पाची एकूण किंमत 18,036 कोटी रुपये असून 2028-29 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान सुमारे 102 लाख मनुष्य-दिवसांचा थेट रोजगारही निर्माण होणार आहे.
महाराष्ट्राची शंभर वर्षांपेक्षा जुनी मागणी या प्रकल्पाद्वारे मंजूर झाली आहे. मनमाड ते इंदूर या सुमारे 309 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गासाठी पहिले सर्वेक्षण 1908मध्ये झाले होते. त्यानंतर या रेल्वे मार्गांसाठी अनेक वेळा घोषणा झाल्या. परंतु प्रत्यक्षात रेल्वे मार्गाचे काम काही सुरु झाले नाही. 18,036 कोटींचा हा प्रकल्प आज मंजूर झाला आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाला जोडणारा हा मार्ग आहे.
हा रेल्वेमार्ग उज्जैनमधील श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि इतर धार्मिक स्थळांना जोडणार आहे. या मार्गामुळे उत्तर महाराष्ट्रातील कांदा-उत्पादकांना बाजारपेठ मिळणार आहे. या मार्गामुळे महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे आणि मध्य प्रदेशातील बरवणी, खरगोन आणि धार या आदिवासी भागांमध्ये नवीन आणि सुधारित कनेक्टिव्हिटी येईल.
SL/ML/SL
2 Sept 2024