रशियन गुप्तहेर व्हेल माशाचा मृत्यू
मॉस्को, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रशियन गुप्तहेर समजल्या जाणाऱ्या व्हाईट बेलुगा व्हेल ‘ह्वाल्दिमिर’चा मृत्यू झाला आहे. BBC च्या वृत्तानुसार 31 ऑगस्ट रोजी नॉर्वेच्या रिसाविका खाडीत मासेमारीसाठी गेलेल्या पिता-पुत्रांना व्हेलचा मृतदेह तरंगताना दिसला. या 14 फूट लांब व्हेलचे वय सुमारे 15 वर्षे होते. वजन 1,225 किलो होते. त्याचा मृतदेह क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आला. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नसून, मोठ्या बोटीच्या धडकेने हा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, त्यांच्या शरीरावर जखमेच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. ह्वाल्दिमीर व्हेलला पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे.
या व्हेलची माहिती जगाला २०१९ मध्ये सर्वप्रथम मिळाली होती. रशियापासून ४१५ किमी अंतरावर नॉर्वेमधील इंगोया बेटाच्या किनाऱ्यावर तो दिसला होता. या भागात बेलुगा व्हेल आढळत नाहीत. त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवले जाऊ लागले. या व्हेलची जवळून पाहणी केल्यावर त्याच्या गळ्याभोवती एक पट्टा दिसला. त्याच्यावर सेंट पीटर्सबर्ग या रशियन शहराचे नाव लिहिले होते. त्याच्या शरीरावर कॅमेरा आणि इतर काहीदेखील बसवण्यात आली होती. त्यामुळेच तो रशियाचा गुप्तहेर व्हेल म्हणून ओळखला जाऊ लागला.
SL/ML/SL
2 Sept 2024