आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिन : नैतिकता सगळ्यांनीच पाळण्याची गरज

राधिका अघोर
आज आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिन पाळला जातो. याच म्हणजे ऑगस्ट महिन्यात 1945 साली जगाने दुसऱ्या महायुद्धाच्या अंताला हिरोशिमा आणि नागासाकी चा विध्वंस पाहिला होता. संपूर्ण मानवजातीला हादरवून सोडणाऱ्या अनुस्फोटाचे ते उग्र भयंकर रूप पाहिल्यानंतर जगात दोन मोठे बदल झाले. एक म्हणजे, अण्वस्त्र मानवजातीसाठी विनाशकारी असल्याची जाणीव सर्व देशांना झाली. आणि ज्याच्याकडे ही अण्वस्त्रे असतील, तो देश शक्तिशाली असेल, हे ही प्रत्येक देशाला कळले.
त्यातूनच जगावर अधिसत्ता गाजवण्याच्या दृष्टीने, शत्रू देशांना भयभीत करण्यासाठी तर कधी स्वतःला एक बलशाली राष्ट्र बनविण्यासाठी प्रत्येक देशात अणुचाचणी करण्याची चढाओढ निर्माण झाली. विकसित देशांनी तर सर्वात आधी स्वतःला अणू संपन्न केलं, मात्र विकसनशील देशही अणुचाचणी करू लागले.
याचा धोका लक्षात घेऊन, संयुक्त राष्ट्रांनी 2 डिसेंबर 2009 रोजी झालेल्या आपल्या सर्वसाधारण सभेत, 29 ऑगस्ट हा दिवस ‘ आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिन म्हणून पाळण्याचा ठराव संमत केला.
वास्तविक भारतासह अनेक देशांची या संदर्भातली वेगळी भूमिका आहे. अण्वस्त्रे विनाशकारी असतात, याबद्दल कुठेही दुमत नाही आणि विनाश कोणालाच नको आहे. मात्र विकसनशील किंवा छोट्या देशांना ही नैतिकता आधी अवस्त्रधारी विकसित बलाढ्य देशांनी पाळावी असे वाटते आणि ते रास्तही आहे. कारण ह्या सर्व राष्ट्रांनी अण्वस्त्रांचा मोठा साठा स्वतःकडे असतांना आपल्या वर्चस्वाच्या बळावर इतर लहान देशांवर दादागिरी करत अशा चाचण्या केल्यास निर्बंध लावले तर ते ” सौ चूहे खाकर बिल्ली हज को चली ” असं होईल.
त्यामुळे अनेक छोट्या देशांना ही अणुचाचणी बंदी मान्य नाही.
भारताची अणुचाचणी बद्दलची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. स्वसंरक्षणासाठीची सज्जता आणि अणू ऊर्जेचा सकारात्मक, मानव कल्याणासाठी वापर. भारताने आपल्या दोन्ही अणुचाचण्या बुद्ध पौर्णिमेला केल्या. जगाला अणू उर्जेचा शांततामय आणि अणू ऊर्जा सकारात्मक कारणांसाठी वापरता येते, फक्त दृष्टिकोन स्वच्छ हवा, असा संदेश भारताने जगाला दिला आणि स्वतः आचरणात आणला. आणि कित्येक ठिकाणी अणुऊर्जेचा सकारात्मक वापर केला जातो.
मात्र, दुसऱ्या महायुद्धाचे भीषण परिणाम आणि बेचिराख शहरे पाहिल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी मानव जातीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी हा दिवस पाळण्यास सुरुवात केली. 16 जुलै 1945 रोजी जगात पाहिली अणुचाचणी झाली, त्यानंतर आजवर 2000 पेक्षा अधिक चाचण्या झाल्या आहेत.
यंदाच्या अणुचाचणी विरोधी दिनाची संकल्पना आहे, ” शून्याकडे जाणारा मार्ग : अण्वस्त्र निःशस्त्रीकरण आणि अणू प्रसार रोखण्यास संयुक्त राष्ट्रांची भूमिका.” अणुचाचण्या कायमच्या थांबवून जगात शांतता आणि सुरक्षितता नांदावी या दिशेने पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. हा उद्देश आदर्श असला, तरीही त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सध्या तरी शक्य नाही.
खरं तर एकीकडे रशिया – युक्रेन आणि दुसरीकडे इस्राएल – हमास संघर्ष संपण्याचे नाव घेत नाही, सगळं जग या युद्धाच्या झळा भोगत आहे. मात्र, प्रत्येक देशाचे, अगदी संयुक्त राष्ट्र संघटनेचे ही स्वतःचे हितसंबंध गुंतले असताना कोणताही देश याविषयी प्रामाणिक भूमिका घेऊ शकत नाही. आणि संयुक्त राष्ट्र संघटना स्वतःच इतकी दुबळी झाली आहे, की तिच्यात सुधारणा केल्याशिवाय, सगळ्या. जगाची प्रतिनिधी किंवा नियामक संस्था म्हणून ती प्रभावी ठरू शकणार नाही.
म्हणून हा आदर्श विचार सोडून द्यायला हवा असं नाही. नव्या पिढीच्या युवकांपर्यंत अण्वस्त्रांचे धोके पोहोचवले पाहिजेत, युद्धस्मारकातून युद्धाची भीषणता पोचवली पाहिजे. साम्राज्यवादी, वर्चस्ववादी भूमिका नाही, तर शांतता आणि परस्पर सहकार्य संपूर्ण जगाच्या भविष्यासाठी हिताचे आहे, या विचारांवर जोर दिला, तर कदाचित पुढची पिढी या आदर्श विचारांपर्यंत पोहोचेल. मात्र त्यासाठी पाहिली पायरी आहे, ती म्हणजे शक्तिशाली, विकसित देशांनी आधी पुढाकार घेत ह्या नैतिकतेची अंमलबजावणी स्वतः करण्याची. मग अविकसित छोटे देश नक्की त्यांचा कित्ता गिरवतील.