खासदार वसंतराव चव्हाण अनंतात विलीन

नांदेड, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नांदेडचे खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्यावर आज २७ ऑगस्टला जिल्ह्यातील नायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना राज्य शासनामार्फत पुष्पचक्र अर्पण करीत श्रद्धांजली दिली. मंत्री महोदयांसोबत शासनामार्फत विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड महानगरपालिकेतील आयुक्त डॉ. महेश डोईफोडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी पोलीस दलातर्फे त्यांना हवेत तीन फेरी झाडून अंतिम सलामी देण्यात आली.
२६ ऑगस्टला हैद्राबाद येथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर आज त्यांचे मूळ गाव असणाऱ्या नायगाव येथे हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत त्यांचे चिरंजीवांनी भडाग्नी दिला. तत्पूर्वी, त्यांना पोलीस दलाच्या वतीने सलामी देण्यात आली. यावेळी त्यांचा पूर्ण परिवार उपस्थित होता.
नायगाव येथे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक पोहोचले होते. तर देशातील आणि राज्यातील राजकीय पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण,खासदार डाॅ.शिवाजी काळगे, शोभा बच्छाव, कल्याण काळे, संजय जाधव, डॉ.अजित गोपछडे, माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात,आ.अमीत देशमुख यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
ML/ML/SL
27 August 2024