रशियातील सर्वात उंच इमारतीवर युक्रेनचा ड्रोन हल्ला
 
					
    सारातोव, रशिया, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल रशिया व युक्रेनमध्ये सुरु असलेले युद्ध अधिकच भीषण रूप धारण करत आहेत. दोन्ही देश माघार घेण्याच्या मनस्थितीत नसून उलट परस्परांवर हल्ले तीव्र करत आहेत. युक्रेननं आता रशियातील सर्वात उंच इमारत व्होल्गा स्कायवर हल्ला केला आहे. त्यामुळं जग हादरलं आहे. अमेरिकेत 26/11 ला झालेल्या हल्ल्याची आठवण यानिमित्ताने जागी झाली आहे.
युक्रेनने लक्ष्य केलेली ३८ मजली इमारत रशियातील सारातोव शहरात आहे. रशियातील सर्वात उंच इमारत अशी ओळख असलेल्या या इमारतीत अनेक कंपन्यांची कार्यालयं आहेत. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे. ड्रोनच्या माध्यमातून हा हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर इमारतीला भीषण आग लागल्याचं व्हिडिओत दिसत आहे.या हल्ल्यात जीवितहानी झालेली नाही. दोन जण जखमी झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे. इमारतीचं मोठं नुकसान झालं आहे. ड्रोनच्या धडकेमुळं इमारतीचे अवशेष कोसळताना दिसत आहेत. हा हल्ला रशियासाठी धक्कादायक व मानहानीकारक मानला जात आहे.
स्थानिक गव्हर्नर रोमन बसुर्गिन यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी टेलिग्रामवर याबाबत माहिती दिली आणि हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं. तिला वाचवण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत आहेत. या हल्ल्यात आणखी एक जण जखमी झाला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये दोन वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. आतापर्यंत या संघर्षात रशियाची आघाडी होती, मात्र अलीकडेच युक्रेनच्या लष्करानं रशियाच्या कुर्स्क भागात हल्ला करून अनेक किलोमीटरपर्यंत ताबा घेतला आहे. यानंतर रशियानंही युक्रेनवर हल्ले तीव्र केले आहेत. अशा प्रकारे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये सुरू असलेले युद्ध अधिक तीव्र झाले आहे.
SL/ML/SL
26 August 2024
 
                             
                                     
                                    