भारत सरकार बांधतय थेट चीनच्या दारापर्यंत पक्का रस्ता
नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सीमेवर सतत कुरघोड्या करत भारताला अडचणीत आणणाऱ्या चीनला लगाम घालण्यासाठी भारत सरकारने एक अत्यंत प्रभावी आणि चपखल उपाययोजना हाती घेतली आहे. यामुळे ड्रॅगनच्या सीमेवरील घातक कारवायांना आळा बसणार आहे. भारत सरकार आता चीनच्या दारापर्यंत पक्का रस्ता तयार करत आहे. या योजनेअंतर्गत बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने (बीआरओ) केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय प्रकल्प बांधकाम महामंडळ यांच्या सहकार्याने भारत-चीन सीमेवर रस्ते बांधण्याच्या धोरणाचा तिसरा टप्पा सुरू केला आहे. सरकारने सीमावर्ती भागातल्या रस्त्यांसोबत गावांच्या विकासावरही पूर्ण भर दिला आहे. पहिल्या टप्प्यांतर्गत 662 गावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी 455 गावं अरुणाचल प्रदेश आणि 35 गावं लडाखमधली आहेत.
भारत आणि चीन यांच्यात अरुणाचल प्रदेशपासून सिक्कीम, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडपर्यंत 3,488 किलोमीटर लांबीची सीमा आहे. या संपूर्ण सीमेवर रस्ता तयार करण्याचा निर्णय घेऊन सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. रस्ते बांधणीच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत सरकार पूर्व लडाखमध्ये पाच नवीन रस्ते बांधणार आहे. याशिवाय अनेक रस्ते दोन ते चार लेनचे करण्यात येणार आहेत. तिसऱ्या टप्प्याअंतर्गत सरकार जगातला सर्वांत उंच बोगदाही बांधणार आहे. 16,580 फूट उंचीवर 4.1 किलोमीटर लांबीचा बोगदा बांधला जात असून त्याचं बांधकाम या आठवड्यात सुरू झालं आहे. या बोगद्याचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही ऋतूमध्ये मनालीहून लडाखला जाणं सोपं होईल.
सरकारने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यांतर्गत 73 रस्ते बांधण्याची योजना तयार केली होती. बीआरओने त्यापैकी 61 रस्त्यांचं बांधकाम जवळपास पूर्ण केलं आहे. तिसऱ्या टप्प्यातल्या रस्ते बांधणीसाठी सरकारने 6,500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याशिवाय सीमेवर वसलेल्या गावांच्या विकासासाठी गृह मंत्रालयाला 1,050 कोटी रुपये दिले आहेत. या प्रकल्पांतर्गत 19 जिल्ह्यांतल्या 2,967 गावांचा विकास केला जाणार आहे. ही गावं अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि लडाखमधली आहेत.
SL/ML/SL
20 August 2024