नाशिकमध्ये बंदला हिंसक वळण, शहरात कलम १४४ लागू
नाशिक, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार आणि मंदिरांच्या तोडफोडीविरोधात सकल हिंदू समाजाकडून आज नाशिक बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान, या बंदला काही दुकानदारांनी विरोध केला. त्यावेळी दुकानं बंद करण्यावरुन दोन गटात वाद झाला. यावेळी आंदोलकांकडून काही दुकानांची तोडफोड करण्यात आली.
याप्रसंगी वेळीच नाशिक पोलीस आणि दंगल नियंत्रण पथकानं घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. तरी, काही काळासाठी मात्र नाशिकमध्ये मोर्चाला हिंसक वळण लागल्याचं दिसून आले, दरम्यान, सध्या नाशिक शहरात कलम १४४ लागू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, नाशिक शहरात अद्यापही काही प्रमाणात तणावपूर्ण परिस्थिती असून नाशिक पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक घटनास्थळावर तळ ठोकून आहे, नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन नाशिक पोलिसांनी केले आहे.
दंगल नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी काही ठिकाणी अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडल्या, तसेच सौम्य प्रमाणात लाठीचार्ज करून जमाव पांगवला. त्यामुळे नाशिक शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
ML/ML/SL
16 August 2024
16 August 2024