आरक्षणाच्या संदर्भात तुमच्या पक्षाची भूमिका जाहीर करा
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने जी धर्मनिरपेक्ष मते घेतली आहेत. महाविकास आघाडीच्या आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान केले आहे. हे उघड होऊन किती दिवस झाले. कोणत्यातरी आमदारांवर कारवाई झाली का? तुमचे धंदे जनतेला दिसत आहेत ते आधी झाका, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी अंबादास दानवे यांना दिला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर दानवे यांनी टीका केली होती, त्याला मोकळे यांनी प्रत्युत्तर दिले.
सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे की, वंचित बहुजन आघाडीची ताकद दिसू लागली किंवा निवडणुका जवळ आल्या की, वंचित बहुजन आघाडीला बी टीम ठरवण्याची घाई या नेत्यांना होते. हे आम्हाला आणि जनतेला नवीन नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नवीन काहीतरी करावं. अंबादास दानवे यांनी बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीवर टीका केली. अंबादास दानवे यांनी स्वतःच्या पक्षाची भूमिका जाहीर करावी. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण पाहिजे ही जी जरांगे पाटील यांनी मागणी केली आहे. याच्या बाजूने तुम्ही आहात की, विरोधात आहात? हे स्पष्ट करा.
उध्दव ठाकरे म्हणतात की, केंद्रात जाऊन कोटा वाढवून आणा. याचा अर्थ तुम्हाला ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण द्यायचे आहे. हीच तुमची भूमिका असेल तर ती स्पष्टपणे जनतेसमोर मांडण्याचे आव्हान मोकळे यांनी दिले आहे.
ज्यांना ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण वाचवता आले नाही. त्यांना आता आरक्षणाच्या संदर्भात भूमिका घ्यायला दबाव येत आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीवर टीका सुरू झाल्याचे मोकळे यांनी सांगितले.
तुमच्या पक्षाचा उमेदवार तुम्हाला स्थानिक स्तरावर निवडून आणता आला नाही. किंबहुना तुम्ही तो निवडून आणला नाही. चंद्रकांत खैरे यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, विरोधी पक्षाने मला मदत केली नाही. त्यामुळे तुम्ही कोणत्या तोंडाने वंचित बहुजन आघाडीवर टीका करत आहात ? असा सवाल मोकळे यांनी केला आहे.
तुमच्या मतदारसंघात तुम्ही जिथे काम करता तिथे संदीपान भुमरे हे शिंदे गटाचे खासदार निवडून आले आहेत. तुम्ही शिंदेसेनेत जाणार अशा चर्चा सुरू होत्या. किंबहुना तुम्ही भविष्यात सुद्धा जाऊ शकता. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीवर टीका करणे, बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका करणे, बाळासाहेबांचे काय धंदे चालले हे म्हणण्यापेक्षा स्वतःचे काही धंदे चालले आहेत याकडे लक्ष द्या, असे म्हणत मोकळे यांनी अंबादास दानवे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
SW/ML/PGB
9 Aug 2024