‘अलबत्या गलबत्या’चे एकाच दिवशी होणार ६ प्रयोग

 ‘अलबत्या गलबत्या’चे एकाच दिवशी होणार ६ प्रयोग

मुंबईदि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

रत्नाकर मतकरी लिखित ‘अलबत्या गलबत्या’ हे व्यावसायिक बालनाट्य आता एका विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. दादरमधील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात गुरूवार, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी सकाळी ७.१५ ते रात्री १०.३० या वेळेत या नाटकाचे ६ प्रयोग होणार आहेत. या नाटकाने १५ ऑगस्ट २०१८ रोजी एकाच दिवशी ५ प्रयोग केले होते, आता एकाच दिवशी ६ प्रयोग करत, नाटकाची टीम नवा विक्रम करणार आहे.दरम्यान, या विश्वविक्रमाबाबत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांच्याकडे अर्ज करून पूर्वकल्पना देण्यात आली आहे. रंगभूमीवर एक व्यावसायिक बालनाट्य पहिल्यांदाच असा विश्वविक्रम करीत आहे, यादृष्टीने हे अर्ज करण्यात आले आहेत, अशी माहिती नाट्यनिर्माते राहुल भंडारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक आम्ही एक बांधिलकी म्हणून करीत आहोत. त्यामुळे प्रयोगाच्या माध्यमांतून जमा होणारी काही रक्कम सेवाभावी संस्थांना मदत म्हणून देण्याचा आमचा नेहमीच मानस असतो. जर नवा प्रेक्षक करायचा असेल, तर बालरंगभूमीकडे गांभीर्याने पाहणे अत्यंत आवश्यक आहे’, असे राहुल भंडारे यांनी सांगितले.‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाचे एकाच दिवशी ६ प्रयोग होणार असल्यामुळे कलाकार व तंत्रज्ञांची मानसिक व शारीरिकदृष्ट्या काळजी घेण्यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे.श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात संपूर्ण दिवस चार डॉक्टर, आहारतज्ज्ञ आणि फिजिओथेरपिस्ट तैनात असतील. प्रत्येक प्रयोगाच्या आधी व नंतर ते कलाकारांची तपासणी करतील.

अद्वैत थिएटर्स निर्मित ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाचे लेखन रत्नाकर मतकरी, दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर यांनी केले असून राहुल भंडारे हे निर्माते आहेत. या नाटकात लक्षवेधी अशा चेटकिणीची भूमिका निलेश गोपनारायण यांनी साकारली आहे. तर सनीभूषण मुणगेकर आणि श्रद्धा हांडे हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत. छत्रपती श्री शिवाजी मंदिर ट्रस्ट यांच्या सहकार्याने १५ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी ६ प्रयोग होणार आहेत. प्रत्येक प्रयोग हा निःशुल्कपणे १०० गोरगरीब व विशेष मुलांना दाखविण्यात येणार असून त्यांच्याशी कलाकार गप्पाही मारणार आहेत. यावेळी ठाण्यातील ‘वंचितांची रंगभूमी’ या संस्थेतील कलाकारांनाही प्रयोग दाखविण्यात येणार आहे.

SL/ ML/ SL

6 August 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *