त्रिंबक देवस्थानात ऑनलाईन तसेच कळस दर्शनाची व्यवस्था
नाशिक दि ६(एमएमसी न्यूज नेटवर्क) :श्रावण महिन्याचा प्रारंभ सोमवारपासून होत असल्यामुळे या पहिल्या श्रावणी सोमवारी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली आहे . भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे आणि होणाऱ्या गर्दीचे नियोजन योग्य प्रकारे व्हावे यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ने विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक आणि त्र्यंबकेश्वर देवस्थानचे परंपरागत कैलास घुले, परंपरागत पुजारी आणि विश्वस्त प्रदीप तुंगार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या विविध सुविधांबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना ते म्हणाले की दिवसभरात सुमारे 15 तास मंदिर उघडे असते. मंदिरामध्ये गर्भगृहात शिवपिंडी काहीशी खाली असल्यामुळे जोपर्यंत भाविक गर्भगृहाच्या समोर येत नाही तोपर्यंत देवाचे दर्शन होऊ शकत नाही. मंदिरामध्ये मर्यादित जागा असल्यामुळे आणि भाविकांची गर्दी जास्त असल्यामुळे सध्याच्या स्थितीमध्ये एका भाविकाला सुमारे तीन ते चार सेकंद पर्यंत प्रत्यक्ष दर्शन होऊ शकते , तरच रांगेत पाठीमागून येणाऱ्या भाविकांचे दर्शन सुलभ होऊ शकते. त्यासाठी मंदिरातील स्वयंसेवक नियोजन करीत असतात, गर्दीमध्ये भाविकांच्या सुविधेसाठी व्हीआयपी दर्शनाने तास मर्यादित करण्यात आले आहेत तसेच ऑनलाईन मुखदर्शन आणि कळस दर्शन सुविधा तसेच शुभेच्छा देणगी दर्शनाची ऑनलाइन व्यवस्था करण्यात आली असून त्रिकाल पूजेच्या पुजाऱ्या व्यतिरिक्त कोणालाही गर्भगृहात प्रवेश करण्यास पाच वर्षापासूनच बंदी करण्यात आली आहे.
भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर ट्रस्ट द्वारे पिण्याचे पाणी आरोग्य सुविधा तसेच अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून लवकरच ट्रस्ट तर्फे प्रसादाला प्रसादालयाची ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
ML/ ML/ SL
6 August 2024