सांगलीत पूरस्थिती कायम , कोयनेतील विसर्ग वाढला
सांगली, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पात्रात एकीकडे पुराचे पाणी टिकून आहे, दमदार पाऊस थांबला असून धरणातील पाण्याचा विसर्ग अद्यापही सुरू आहे. सध्या कोयनेतील विसर्ग वाढविण्यात आला आहे.मात्र अलमट्टी तून मोठा विसर्ग सुरू असल्याने यावर्षी सांगलीकर जनतेला मोठ्या पुराला तोंड द्यावे लागणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सांगली परिसरातील लोकांनी यापूर्वी दोन मोठे पूर अनुभवले आहेत. त्यामुळे यावर्षी पुन्हा महापूर येणार अशी भीती वाटत होती. मात्र दिलासादायक चित्र या भागात तयार झाले आहे. कोयनेतील पाण्याचा विसर्ग थोडा वाढला आहे. तरीही कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात पुढे सोडले जात आहे. त्यामुळे पुराचा धोका टळला आहे. कृष्णा तसेच वारणा नद्यातील पाण्यावर सांगलीकर जनतेचे भवितव्य अवलंबून आहे. धरण क्षेत्रात पडणारा पाऊस आणि दोन्ही धरणातील विसर्ग यावर पूरस्थिती अवलंबून असते. यावर्षी सुरुवातीला मोठा पाऊस झाल्यामुळे लोकांना पुराची भीती वाटत होती.
शहरी आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. पुराचे हे पाणी अनेक ठिकाणी आजही साठून आहे. अद्यापि मदत छावण्यामध्ये लोक आणि जनावरे आसरा घेत आहेत. मात्र प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीमुळे पुराचा धोका तळला आहे. सैन्य आणि राष्ट्रीय सुरक्षा दलाचे जवान या भागात थांबून आहेत. काही ठिकाणी स्वच्छतेचे काम सुरू झाले आहे. पूरस्थितीमुळे काही भागात वैरणटंचाई निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात काही ठिकाणी ओला चारा उपलब्ध करून दिला. आज कोयना धरणातील विसर्ग वाढल्यामुळे सांगलीतील आयर्विन पुलाजवळ पाण्याने धोका पातळी ओलांडली आहे. आज सकाळी सहा वाजता आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी चाळीस फूट सहा इंच झाली आहे.
ML/ML/PGB
1 Aug 2024