जागतिक स्तन्यपान सप्ताह : स्तनपानाच्या उदात्त भावनेला हवी शास्त्रीय ज्ञानाची जोड..

 जागतिक स्तन्यपान सप्ताह : स्तनपानाच्या उदात्त भावनेला हवी शास्त्रीय ज्ञानाची जोड..

मुंबई, दि. 1 (राधिका अघोर) : ऑगस्ट महिन्याची सुरुवात होते, जागतिक स्तन्यपान सप्ताहाने. स्तनपानाचे महत्त्व समजावून सांगत, त्याविषयी जनजागृती करणं आणि स्तनदा मातांना प्रतिष्ठा तसेच योग्य त्या सोयी सुविधा मिळवून देणं यासाठी, दरवर्षी, एक ते 7 ऑगस्ट हा सप्ताह, जागतिक स्तन्यपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. 1992 साली वाबा म्हणजेच World Alliance for Breastfeeding Action (WABA) या संस्थेनं ह्या सप्ताहाची सुरुवात केली होती. त्यानंतर हळूहळू याचा प्रचार-प्रसार होत गेला आणि आता जगातल्या सुमारे 120 देशात हा सप्ताह साजरा केला जातो.

स्तनपान आणि स्तनदा मातांचा भारताच्या दृष्टीने विचार करता, आपल्याला तीन गोष्टींवर भर द्यावा लागेल, किंवा तीन वर्गातल्या महिलांचा विचार करावा लागेल. एक सर्वसामान्य घरातील कष्टकरी महिला. त्या ज्या वर्गातून येतात, तिथे स्तनपानाची परंपरा असली तरी, माता आणि बाळाची हवी तशी काळजी घेतली जात नसल्यानं, त्या स्तनपानातून बाळाला हवे तसे पोषण मिळत नाही. यासाठी, गरोदरपणात आणि प्रसूतीनंतरही आईच्या आरोग्याची, तिला सकस अन्न मिळेल याची काळजी घ्यायला हवी. स्वतः आईने पण ती घ्यायला हवी आणि तिच्या कुटुंबीयांनी. स्तनदा माता निरोगी आणि आनंदी असेल, तरच बाळ निरोगी होऊ शकेल. आणि बाळ निरोगी होणं ही त्या कुटुंबाची सर्वात मोठी मिळकत असेल.

याचा विचार, त्या कुटुंबांमध्ये पोहचवणे आणि रुजवणे ही सरकार आणि इतर स्वयंसेवी संस्थांची जबाबदारी असते. Health is wealth चा तो पाया आहे, त्यावरच बाळाच्या शरीराची इमारत उभी राहणार आहे. त्यामुळे, अशा कुटुंबांमध्ये स्तनपानाचे महत्त्व सांगणे, त्यासाठी स्तनदा मातांना पुरेसा पोषक आहार आणि आराम मिळणं, किती काळ स्तनपान करु शकतात, ते करण्याची योग्य पद्धत कोणती, बाळांची कशी काळजी घ्यावी, याचं पारंपरिक ज्ञान कुटुंबातून तर मिळतेच, पण त्या पलीकडे अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या यांच्याकडूनही हे मार्गदर्शन आणि सरकारी योजनांचा लाभ अशा महिलांना मिळतो.

दुसरी श्रेणी म्हणजे मध्यमवर्गीय नोकरदार महिला. आज देशातली 50 टक्के स्त्रीशक्ती, अर्थव्यवस्थेत आपलं योगदान देत आहे. नोकरदार महिलांची संख्या अधिक आहे. आणि नोकऱ्यांचे स्वरूपही अत्यंत संमिश्र झाले आहे. त्यांच्यासमोरही पुरुषांप्रमाणेच, आपल्या नोकरीतील आव्हाने असतात. मुंबईसारख्या ठिकाणी घर आणि कामाच्या जागा यात खूप अंतर असते. या सगळ्या अडचणींवर मात करत, नोकरदार महिलांना स्तनपान देणं शक्य होईल याला प्राधान्य देऊन, त्याच्या सुविधा देण्याची गरज आहे. यासाठी कार्यालयांजवळ स्तनपानाची व्यवस्था करणे, त्यासाठी विशेष खोली/ जागा उपलब्ध करण्याची गरज आहे. स्तनपान, बाळाच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असते, त्यामुळे नोकरदार महिला, कुटुंबे आणि त्यांच्या संबंधित कार्यालयांनी त्याला प्राधान्य द्यायला हवे.

तिसरी श्रेणी, म्हणजे उच्चभ्रू समाजातील माता. इथे स्तनपानासाठी व्यवहारीक अडचणी येत नसल्या, तरी स्तनपानाचे महत्त्व न समजल्यामुळे, किंवा ते मागास असल्याचा समज झाल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. विशेषतः आजच्या काळात उच्च मध्यमवर्ग, उच्चभ्रू समाजात महिलाही पुरुषांच्या बरोबरीने मद्यपान, धूम्रपान करतात. त्याचा त्यांच्या आरोग्यावर तर वाईट परिणाम होतोच; पण बाळासाठीही ते अत्यंत घातक असते दूसरा वेडगळ समज या वर्गातल्या लोकांमध्ये असतो तो म्हणजे, स्तनपानामुळे महिलांची फिगर खराब होते, आणि म्हणून ते टाळणे. खरं तर असं काहीही होत नाही. मात्र, तात्पुरते होत असले, तरीही, स्त्रीचे बाळ लहान असेल तेव्हा तिने केवळ ‘आई’ म्हणून स्वतःकडे बघणे आवश्यक असते. ही दृष्टी, या उच्चवर्गीय स्त्रियांमधे नसते.
स्तनपान इतके आवश्यक का? आज बाजारात इतके पर्यायी पौष्टिक खाद्यपदार्थ बाळांसाठी उपलब्ध असतांना, स्तनपान का करावे, याचेही महत्त्व स्त्रिया-कुटुंबांना सांगायला हवे.

आईचे दूध नवजात बालकासाठी सर्वात पौष्टिक असते.. ते केवळ पोषणच वाढवत नाही, तर त्याच्यात रोगप्रतिकार शक्ती वाढवते, आईच्या दूधामुळे बालकाची हाडे मजबूत होतात, स्नायू मजबूत होतात, ज्या काळात बालकांचे एक सुदृढ शरीर घडायला हवे आहे, त्या काळात आईचे दूध त्याला मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
भारतात तर, आई मुलांचे नाते, अत्यंत उदात्त नाते समजण्याची परंपरा आहे, आणि हे नातं वर्णन करण्यासाठी, काव्यातून कायम आधार घेतला जातो, तो ‘पान्हा फुटण्याच्या’ संकल्पनेचाच. थोडक्यात, स्तनपानाची उदात्त प्रेमळ भावना आपल्याकडे आहेच; त्यालाच शास्त्रीय ज्ञानाची जोड देत, हा अनुभव आई-मूल आणि कुटुंबासाठीही आनंददायी बनवला, तर येणारी निरोगी पिढी घडवतांना मदत होईल.

RA/ML/PGB
1 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *