केरळमध्ये ‘माळीण’सारखी दुर्घटना, वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात ४४ जणांचा मृत्यू

केरळमधील वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीजवळ मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागात भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ४४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश आहे. तर 100 हून अधिक लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. बचाव कार्यात अग्निशमन दल, NDRF आणि स्थानिक आपत्कालीन प्रतिसाद दलाचे जवळपास 250 जवान सहभागी आहेत. एनडीआरएफची अतिरिक्त टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली आहे. मुसळधार पावसळामुळे मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास दरड कोसळली. यानंतर पहाटे 4.10 च्या सुमारास आणखी एक दरड कोसळली. सततच्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.