डॉ.स्नेहलता देशमुख कालवश
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ख्यातनाम शल्यविशारद, शिक्षणतज्ज्ञ तसेच मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ स्नेहलता देशमुख यांचं वयाच्या ८५ व्या वर्षी आज देहावसान झाले. बालरोगतज्ज्ञ म्हणून ख्याती असलेल्या देशमुख यांनी गर्भसंस्कार, नवजात शिशू आणि माता यांचा आहार या विषयावर महत्त्वाचं कार्य केलं आहे. त्या मुंबई , शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या अधिष्ठात्या होत्या.
1995 मध्ये त्यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली. आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक धडाडीचे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांतील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर त्या विद्यार्थ्याच्या किंवा विद्यार्थिनीच्या आईचे नावही लिहिणे. गर्भसंस्कार तंत्र आणि मंत्र, तंत्रयुगातील उमलती मने, अरे संस्कार संस्कार इत्यादी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली आहे. सध्या मुंबईच्या पार्ले टिळक विद्यालय संस्थेच्या संचालक मंडळ विश्वस्त म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यांना ‘डॉ. बी.सी. रॉय पुरस्कार’, ‘धन्वंतरी पुरस्कार’, हे पुरस्कार मिळाले होते.
ML/ML/SL
29 July 2024