‘लाडकी बहिण’ योजनेला वित्तविभागाचा विरोध नाहीच

 ‘लाडकी बहिण’ योजनेला वित्तविभागाचा विरोध नाहीच

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काही प्रसारमाध्यमांमध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेला वित्तविभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित आहेत. प्रसारमाध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे कृपया थांबवावे असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘एक्स’ वर ट्वीट करून केले आहे.

दरम्यान राज्यातील कुणाचाही अशा बातम्यांवर विश्वास बसणार नाही, अशी खात्री व्यक्त करतानाच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक भगिनींना सहभागी करून घेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.

महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि अर्थ तथा नियोजनमंत्री म्हणून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना राज्याच्या वर्ष २०२४ – २५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात ही योजना सादर केली आहे. वित्त तथा नियोजन, सर्व संबंधित विभाग तसेच राज्यमंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात केल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे.

चालू आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक एकूण ३५ हजार कोटी रुपयांच्या संपूर्ण रकमेची तरतूद या वर्षीच्याच अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार? हा प्रश्नच उद्भवत नाही असे ठणकावून सांगतानाच महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे हेही आवर्जून पवार यांनी सांगितले आहे.

राज्यातील माता-भगिनी- मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण तसेच सर्वांगीण सक्षमीकरणासाठी, मान, सन्मान, स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्यशासनाची तयारी आहे. त्यामुळे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला या राज्यातील कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही आणि असूच शकत नाही असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

ML/ML/SL

27 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *