शपथ घेऊन सांगा,अडाणींकडून निधी घेतला की नाही?

 शपथ घेऊन सांगा,अडाणींकडून निधी घेतला की नाही?

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मलिदा खाण्यासाठीच धारावीच्या प्रश्नावर उबाठाची उठाठेव सुरु आहे. धारावी पुनर्वसनाला विरोध म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्ते माजी खासदार संजय निरुपम यांनी केली. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगावे की त्यांनी अदानींकडून निधी घेतला की नाही? असा परखड सवाल निरुपम यांनी विचारला आहे.
बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, जानेवारी २०१९ मध्ये महायुतीचे सरकार असताना धारावी पुनर्विकासाच्या संदर्भातील अदानींचे टेंडर मागे पडून सेकलींक कंपनीला टेंडर मिळालं होते. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे सेकलींकने यातून माघार घेतली होती. २०२० मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने सेकलिंकचे टेंडर रद्द केले होते आणि अदानींना वाट मोकळी करून दिली होती. कुणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतला होता याचेही उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यायला हवे.

शरद पवार आणि उद्योगपती अदानी यांचे सलोख्याचे संबंध संबंध भारताला माहित आहेत, त्यांचा तुमच्यावर दबाव होता का, असा प्रश्न निरुपम यांनी विचारला. महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर धारावी पुनर्विकासंदर्भात टेंडर मसुदा मविआप्रमाणेच कायम ठेवला त्यात काहीही वेगळे नियम लावण्यात आले नाहीत. अटी आणि शर्ती त्याच आहेत, मग विरोध का? उबाठा आता केवळ विरोधाला विरोध करण्यासाठी पालुपद लावत आहे, अशी टीका निरुपम यांनी केली.

धारावीतल्या झोपडीधारकांच्या भल्यासाठीच पात्र आणि अपात्र लोकांना सरसकट घरे देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे जळफळाट झालेल्या उबाठाने डिसेंबर २०२३ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर धारावी पुनर्विकासाच्या संदर्भात आंदोलन केले होते. त्यानंतर आता जुलै महिन्यात उबाठा पुन्हा हा विषय उचलून धरत आहे. गेले सहा महिने उद्धवजी का गप्प होते? आता पुन्हा निवडणुकीकरिता देणग्या मिळवण्यासाठी तुमची उठाठेव चालली आहे का? अशी खरमरीत टीका निरुपम यांनी केली. उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत हे खरं आहे, कारण त्यांनी हिंदुत्व कधीच सोडले असून मुस्लिम तुष्टीकरण करत आहेत, असा घणाघात निरुपम यांनी केला.

निरुपम म्हणाले की, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच, धारावीतल्या झोपडीधारकांच्या स्वप्नांचा चुराडा करण्यासाठी उबाठा स्वार्थी राजकारण करत आहे. उबाठा टीडीआरचा बागुलबुवा करत आहे. डेव्हलपमेंट प्लॅन नुसारच टीडीआर वापरण्यात येणार आहेत. जमीन सरकारचीच असणार आहे. अदानी समूह केवळ विकासकाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शपथ घेऊन अदाणींकडून पैसे घेतले की नाही, हे जाहीर करावे असे आव्हान निरुपम यांनी दिले.

ML/ML/PGB 22 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *