कॅम्लिन उद्योग समूहाचे प्रमुख सुभाष दांडेकर यांचे निधन
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चित्रकलेसाठीच्या साहित्य निर्मितीमध्ये जगप्रसिद्ध असलेल्या कॅम्लिन उद्योगसमूहाचे प्रमुख मराठमोळे उद्योजक सुभाष दांडेकर यांचे आज (१५ जुलै) सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी ३.३० वाजता दादरमधील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे एक उत्तम उद्योजक व रंगांचा निर्माता हरवल्याची खंत उद्योग आणि कला विश्वातून व्यक्त करण्यात येत आहे. सुभाष दांडेकर यांनी अनेक वर्षे या कंपनीची धुरा वाहिली. कॅमलिन हा एक आंतरराष्ट्रीय ब्रँड म्हणून पुढं आणण्यात सुभाष दांडेकर यांचा मोठा वाटा होता. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी लहानांपासून थोरांपर्यंत सर्व कलाप्रेमींच्या आयुष्यात रंग भरले.
शालेय विद्यार्थ्यांना लागणारी गणितीय उपकरणे, पेन्सिल, मार्कर, शाई यांसह चित्रकार व अन्य कलाकारांना लागणारे सर्व प्रकारचे साहित्य, कार्यालयीन उत्पादने आणि व्यावसायिक उत्पादनांची निर्मिती कॅम्लिन या कंपनीकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. या कंपनीची गेली अनेक वर्षे धुरा वाहताना दांडेकर यांनी उत्पादनांची गुणवत्ता व मूल्यांशी कधीच तडजोड केली नाही. काळानुसार बदलत गेलेल्या तंत्रज्ञानाचा पूरेपूर वापर करून सतत नवे प्रयोग करण्यावर त्यांनी भर दिला.
सुभाष दांडेकर यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनं राज्यातील व्यापार व उद्योगाच्या वाढीसाठी अनेक नवे उपक्रम सुरू केले. त्यांच्या निधनानं एक हक्काचा मार्गदर्शक हरपल्याची भावना उद्योग वर्तुळात व्यक्त होत आहे. कॅमलिनचा पसारा वाढवताना त्यांनी मूल्यांशी तडजोड केली नाही. कर्मचाऱ्यांच्या हिताला आणि श्रमाला त्यांनी कायम महत्त्व दिलं. नवनवीन तंत्रज्ञान, कौशल्ये आत्मसात करण्यासाठी जी साधनं उपलब्ध आहेत, त्यांचा पुरेपूर वापर करून सतत शिकण्यावर त्यांचा भर होता.
SL/ML/SL
15 July 2024
SL/ML/SL
15 July 2024